कत्तलीसाठी जाणार्‍या १६ गुरांची सुटका

    दिनांक : 17-Sep-2020
Total Views |

pachora_1  H x
बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने गुरांना जीवदान;
आयशर मालकासह चालकावर पिंंपळगाव पोलिसात गुन्हा
तभा वृत्तसेवा
पाचोरा, १७ सप्टेंबर
रिक्षाने शिंदाड़ येथे कामानिमित्त जात असताना बजरंग दल तालुका संयोजक दिपक आनंदा मोरे, (३०) धंदा- रिक्षा चालक, (लोहारी बु. ता पाचोरा ) यांना १७ रोजी सकाळी ९-४५ वा.वरखेडी ते राजुरी फाटा रोडवरील वाणेगांव फाट्याजवळ रोडचे कडेला डाव्या बाजूला आयशर क्र.एम.एच.१९झेड-६४००) ही उभी असलेली आढळून आली. यावेळी रिक्षा थांबवून आयशर गाडीजवळ जाऊन बघितले असता त्यात पाठीमागील बाजूस ताडपत्री टाकलेली आढळून आली. ताडपत्री वरच्या बाजूने फाटलेली असल्याने गाडीवर चढून आत डोकावून पाहिले असता, त्यात १६ गुरे असल्याचे लक्षात आले.
गाडीचा चालक आढळून आला नाही. त्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ता- हेमंत गणेश गुरव याना फोनकरुन सदरील घटनेबाबतमाहिती देण्यात आली. थोड्या वेळाने तेथे लोकानी गर्दी केली . त्यानंतर लोकांच्या मदतीने ही गाडी पिंपळगांव (हरेश्वर) पो. स्टे. ला नेण्यात आली. तेथे पोलीसांचे मदतीने आयशर गाडीचे पाठीमागे लावलेले लाकडी फळ्या काढून गाडीमध्ये १६ गो-हे निर्दयतेने गाडीमध्ये कोंबून भरलेली आढळून आले. या गुरांमध्ये पांढर्‍या रंगाचे ५ गोर्‍हे त्यापैकी ३ गोर्‍ह्यांचे पाठीवर किरकोळ जखमा दिसून आल्या. काळे पांढरे रंगाचे ६ गो-हे त्यापैकी एका गोर्‍ह्याच्या मानेवर मोठी जखम दिसून आली. सर्व गोर्‍हे अंदाजे ३-४ वर्षे वयाचे आहेत. त्यानंतर पोलीसांनी हेमंत गुरव, योगेश चौधरी यांच्या मदतीने १६ गुरे सातगांव (डोंगरी) येथील प्रेममुर्ती संत मिराबाई गोशाळा या गोशाळेत दाखल करण्यात आली.
 
या घटनेबाबत आयशर गाडी क्र. (एम.एच.-१९/झेड-६४००) या गाडीमध्ये १६ गोर्‍हे निर्दयीपणे आयशर वाहनामध्ये कोंबून गुरांची वाहतुक करुन त्यांना दुखापत होईल.त्यात त्यांचा यातना होऊन मृत्यू होईल , अशी वाहतूक करतांना आढळून आले. याबाबतची फिर्याद बजरंग दल तालुका संयोजक दीपक आनंदा मोरे यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. आयशर गाडीचा चालक व मालक (नाव पत्ता माहित नाही) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयशर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गुरे ही वरखेडी बाजारातून खरेदी करून मराठवाड्यात कत्तलखान्यात जात असल्याचे बजरंग दलाचे हेमंत गुरव यांनी सांगितले.