जळगाव कोरोनामुक्त झाले का?

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |

logo_1  H x W:
 
जळगाव, ९ ऑगस्ट
जिल्ह्यात आणि शहरातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल असे लक्षण काही दिसत नाही. असे असूनसुद्धा शासकीय आणि राजकीय पक्षांतर्फे दररोज आंदोलने, मोर्चा आणि कार्यक्रम होत आहेत. त्यावेळी होणारी गर्दी बघून जणू जळगाव कोरोनामुक्त झाले की काय, असे वाटावे तसे चित्र सध्या शहरात दिसते.
 
जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. तसेच शहरात प्रत्येक भागात कोरोना रुग्ण सापडतोच. त्यामुळे नागरिक स्वतःची काळजी घेत शक्यतो बाहेर जाणे टाळतात. तर दुसरीकडे मात्र राजकीय पक्षांतर्फे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने सुरु आहेत. अशावेळी आंदोलनातील किंवा कार्यक्रमातील एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असल्यास कोरोनाचा सामाजिक संसर्ग होण्यास अधिक वेळ लागणार नाही. त्यातच जिल्ह्यात किंवा शहरात कुठलाही मंत्री आल्यास तेथे जमणार्‍या बेजबाबदार कार्यकर्त्यांची गर्दी बघूनही कोरोना जळगावमधून पळाला की काय, असा भास होतो.
 
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाच्या निर्देशानुसार धार्मिक कार्यक्रमांसह अंत्यविधीसाठीसुद्धा मोजकेच व्यक्ती उपस्थिती देवून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यावेळी तोडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि हात धुणे आदी बाबींची काळजी घेतली जाते. परंतु, दुसरीकडे सर्वकाही माहित असूनसुद्धा सुशिक्षित कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आंदोलनात सहभागी होतात. त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडाला मास्क असतोच असे नाही. अशावेळी काहींवर पोलीस प्रशासन कारवाई करते, तर कुणाला मुभा देते. परंतु, कोरोनाच्या काळात पोलिसांना कारवाई करण्याची वेळ यावी, हे कितपत योग्य आहे ?
 
एखाद्या मंत्र्याचा दौरा असल्यास शेकडो कार्यकर्ते बिनधास्तपणे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविताना दिसतात. कार्यक्रमापूर्वी सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन केले जाते. पण प्रत्यक्षात मात्र ते पाळले जात नाही. उद्घाटनाला पाच किंवा सहा व्यक्ती अपेक्षित असतात येते सर्व पदाधिकारी, कर्मचारी गर्दी करतात. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही ? मग कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली तर नवल काय ? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.
 
जाग येणार तरी कधी ?
जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचा बळी घेतला असून आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ६०८ रूग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ८६२ रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तरीही आपणास जाग येत नाही त्यामुळे दररोज बाधितांची संख्या वाढतच आहे. बाधितांमध्ये राजकीय व्यक्ती आणि शासकीय कर्मचारीसुद्धा आहेत. शासनाच्या आकडेवारीनुसार ७५ ते ८० टक्के कोरोनाबाधितांना कोरोनासदृश लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आंदोलनात सहभागी व्यक्ती कोरोनाबाधित आहे की निरोगी हे कसे कळणार ? आंदोलन करायचे, निवेदने द्यायचे असल्यास मोजके कार्यकर्ते घेवून करता येईल, त्यात सर्वांचेच भले होईल. परंतु, राजकीय पक्षाच्या कार्यकत्यांनी हे समजून घेतले तरच शहर कोरोनामुक्त होईल. पण यांना तर देखाव्याची हौस असते ना ? मग ही समस्या कशी सुटेल ?