अयोध्येत पुन्हा बाबराच्या नावे मशीद नाही

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |
 
फाऊंडेशनचा निर्णय; मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार
 
 
लखनौ : उत्तरप्रदेश सरकारतर्फे अयोध्येत देण्यात आलेल्या भूमीवर पुन्हा बाबराच्या नावाने मशीद उभारली जाणार नाही, असे सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे.
 
 
 
bell_1  H x W:
 
 
इस्लाममध्ये मशीद उभारण्यासाठी शिलान्यास कार्यक्रमाची परवानगी नाही. केवळ पाया खोदूनच मशिदीच्या कामाला सुरुवात होते. मात्र, 5 एकर जमिनीवर प्रस्तावित मशिदीच्या परिसरात उभे राहणारे रुग्णालय, शाळा, सार्वजनिक स्वयंपाकगृह, ग्रंथालय आणि इतर जनसुविधांच्या शिलान्यासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही निश्चितच निमंत्रण देण्यात येईल, असे इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या ट्रस्टच्या मार्फतच या मशिदीचे निर्माण होणार आहे. प्रस्तावित मशिदीच्या परिसरात जनतेसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत आणि जनतेला सवलती देण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे असते. यामुळेच शिलान्यासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित केले जाणार आहे, अशी स्पष्ट भूमिका प्रवक्त्यांनी मांडली.
 
 
 
अयोध्येजवळील रौनाहीच्या धन्नीपूर येथे उभारल्या जाणार्‍या या मशिदीचे नाव बाबराच्या नावावरच असेल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये सुरू होती. मात्र, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही चर्चा फेटाळली असून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी, मशिदीच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी कुणी मला बोलावणार नाही आणि मीही जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने नुकतीच इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टची स्थापना केली आहे. ही संस्था अयोध्येत मशीद आणि त्याच्या भोवताली रुग्णालय, समाजभवन आणि सार्वजनिक स्वयंपाकगृह उभारणार आहे. तसेच तेथे इस्लामशी संबंधित एक संशोधन केंद्र देखील राहणार आहे.
 
 
या फाऊंडेशनचे सचिव अतहर हुसैन यांनी धन्नीपूर गावात उभ्या राहणार्‍या मशिदीच्या परिसरात मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.