मेंदूवर कोरोना संसर्ग संकटाचा परिणाम सर्वाधिक

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |
मानसिक, शारीरिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात तणाव
 
 
नवी दिल्ली : कोरोना संसर्ग संकटाचा परिणाम मानवी शरीरच नाही तर मेंदूवर होत असून, त्याचा सरळ परिणाम दिनचर्चेवर पडत असल्याचे एका संशोधनामधून समोर आले आहे. याद्वारे निर्माण होणारा मानसिक तणाव दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती अमेरिकन नियतकालिकामध्ये प्रकाशित झाली आहे.
 
 
 
 
brane-damage_1  
 
संशोधनादरम्यान, अभ्यासकांनी 842 लोकांना समाज माध्यमातून कोरोना विषाणू आणि टाळेबंदीच्या संदर्भातील प्रश्न विचारले. पूर्वीपासून कुण्या आजाराशी झुंजत असलेल्या व्यक्ती, 70 वर्षांच्या आसपासच्या वयोगटातील व्यक्ती, कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असलेले आणि गर्भवतींचा अभ्यास करण्यात आला. यात 38 वर्षांपर्यंतच्या महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. सर्वेक्षणात सहभागी 22 टक्के लोकांनी आपल्या मानसिक स्थितीबाबत माहिती दिली. यात स्वभाव बदल, तणाव अशी काही लक्षणे होती.
 
 
 
टाळेबंदीदरम्यान अनेकांनी मानसिक आणि शारीरिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात तणाव सहन केला, असे विश्लेषणनंतर संशोधकांना दिसून आले. डॉक्टरांनी पूर्णपणे आश्वस्त केल्यानंतरही 15 टक्के लोक आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, या भीतीने तणावाखाली होते. आधीपासूनच काही आजार (रक्तदाब, मधुमेह आदी) सहन करत असलेल्या तसेच वयस्क व्यक्तींमध्ये अधिक चिंता अधिक दिसून आली.
 
 
 
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीमधील आव्हानांचा मानसशास्त्रीय पद्धतीने सामना करता येईल, संशोधकांचे म्हणणे आहे. मानसोपचारांची मदत घेतल्याने मेंदूवर सकारात्मक परिणाम दिसून येतो, व्यक्तीला अशा परिस्थितीचा सामना करण्यास मदत मिळते, असा निष्कर्षही संशोधकांनी काढला आहे. याशिवाय अभ्यासगटाने वयस्कर आणि आधीपासून आजारी असलेल्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी एका विशेष योजनेवरही भर दिला आहे.