'अशी' आहे कोरोनाची २४ तासातील धक्कादायक आकडेवारी

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |
 
नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस वाढत्या कोरोना संक्रमितांच्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी देशात २४ तासातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासात देशभरात ६४ हजार ३९९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
 

Corona_Figure_1 &nbs 
 
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना संक्रमितांच्या संख्येने २१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या आता २१ लाख ५३ हजार ११ वर पोहोचली आहे. एकूण संक्रमितांपैकी सध्या देशात ६ लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे दुपटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४ लाख ८० हजार ८८५ इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशात ४३ हजार ३७९ रुग्णांचा बळी गेला आहे.
 
 
महाराष्ट्रात सध्या १ लाख ४७ हजार ३५५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ही संख्या सर्वात मोठी आहे. तर, गेल्या २४ तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे २७५ रुग्णांचा तर तमिळनाडूत ११८, आंध्र प्रदेशात ९७, कर्नाटकात ९३ आणि पश्चिम बंगालमध्ये ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
 
दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत एकूण २ कोटी ४१ लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर, ८ ऑगस्ट रोजी ७ लाख १८ हजार ३६४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.