कोविड केंद्र असलेल्या हॉटेलला आग; 10 मृत

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |
 आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील घटना
 
 
विजयवाडा : कोरोना केंद्र म्हणून वापर होत असलेल्या आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका हॉटेलला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 30 जणांना हॉटेलमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. ही आग विद्युत शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
 
 

vijayvada_1  H  
 
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
 
 
आग लागलेल्या स्वर्ण पॅलेस हॉटेलचा वापर सध्या कोरोना केअर सेंटर म्हणून करण्यात येत आहे. हॉटेलमध्ये 30 रुग्ण व 10 वैद्यकीय कर्मचारी होते. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
कोरोना केंद्राला आग लागल्याची ही या आठवड्यातील देशातील दुसरी घटना आहे. यापूर्वी गुजरातमधील रुग्णालयातही आग लागली होती. 6 ऑगस्ट रोजी अहमदाबादच्या कोरोना रुग्णालयात भीषण आग लागली व त्यात 8 रुग्णांचा मृत्यू झाला.
 
 
50 लाख नुकसानभरपाई देण्याची घोषणा
या हॉटेलला एक खाजगी रुग्णालय- रमेश हॉस्पिटलने कोरोना केअर सेंटर चालविण्यासाठी भाडेपट्टीवर घेतले होते, अशी माहिती आंध्र प्रदेशचे गृहमंत्री एम. सुचरिता यांनी दिली.