पाकिस्तानातून आलेल्या 11 शरणार्थींचा मृत्यू

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |
 
 
एकाच कुटुंबातील सदस्य; राजस्थानमधील घटना
 
 
जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये 11 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व जण पाकिस्तानातून आलेले शरणार्थी असल्याची माहिती आहे. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. प्राथमिकदृष्ट्या विषारी वायूमुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. देचू पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतले.
 
 
 
refugees_1  H x
 
 
हे सर्व अचलावता नावाच्या गावात शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा पोलिस शोध घेत आहेत. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
 
 
घटना घडली त्यावेळी या कुटुंबातील एक बहीण रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी आली होती. त्यामुळे घरात एकूण 12 सदस्य होते. त्यातील एक सदस्य रात्री झोपण्यासाठी शेतात गेला होता. सकाळी येऊन पाहिले तेव्हा त्याला संपूर्ण कुटुंबातील सदस्य मृतावस्थेत आढळले. एकदम 11 मृतदेह अचानक एकाच वेळी सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.