घेणारे नव्हे तर, समाजासाठी देणारे हात व्हा!

    दिनांक : 06-Aug-2020
Total Views |
‘तरुण भारत’ भेटीत उद्योजक नंदू आडवाणी यांचे प्रतिपादन
 

nandu ddf_1  H
 
जळगाव : समाजाचे सहकार्य आणि जळगावकरांची साथ ही वेळोवेळी लाभत असतेच. सामाजिक क्षेत्रात काम करताना घेणार्याचे नव्हे तर देणार्यांचे हात व्हावे. आपल्यानंतरही आपल्या कामाची ओळख राहील असे काही चांगले कार्य करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. त्यातूनच समाजासाठी काही नवीन करण्याचीही प्रेरणा मिळत असते, असे प्रतिपादन शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि केशवस्मृती सेवासंस्था समुहाच्या गॅसदाहिनी प्रकल्पाचे प्रमुख नंदू आडवाणी यांनी केले.
 
गुरुवारी त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिल्यानंतर सहकार्यांशी मनमोकळी बातचीत करताना ते बोलत होते. माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव संजय नारखेडे यांनी त्यांना ‘सेवाभावे उजळो जीवन’हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत केले. केशवस्मृती सेवासंस्था समुहातर्फे शहरात नेरी नाका स्मशानभूमीमध्ये गॅसदाहिनी सुरु करण्यात येणार आहे. त्या प्रकल्पाचे प्रमुखपद नंदू आडवाणी यांच्याकडे आहे. तसेच लिकर व्यवसाय आणि सिव्हिल कंस्टक्शनमध्येही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
भरतदादांचा माझ्यावर प्रभाव
सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचा स्त्रोत असलेले भरतदादा अमळकर यांचा माझ्यावरही प्रभाव आहे. त्यातच गॅसदाहिनी प्रकल्पाची जबाबदारी केशवस्मृती सेवासंस्था समुहाचे प्रमुख भरतदादांनी माझ्यावर सोपवणे हे माझे भाग्यच असल्याचे सांगून ते म्हणाले, समाजसेवेची मला ही चांगली संधी मिळाली आहे, त्यानुसार कार्य करीत आहे. तसेच जैन धर्मातील आचार्य विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज यांचाही माझ्यावर खूप प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले.
 

nandu d_1  H x  
 
कार्याबद्दल समाधानी
मी आजवर केलेल्या सामाजिक, व्यावसायिक आणि सेवाभावी कार्याबद्दल समाधानी आहे. मात्र यापुढेही अजून बरेच कार्य करायचे आहे. कोणताही व्यवसाय चांगला किंवा वाईट नसतो. माणुसकी ठेवूनच व्यवसाय केल्यास तो चुकीचा ठरत नाही. आपण कोणाला काही देऊ शकत नसल्यास दुसर्‍याकडूनसुद्धा काही घेण्याचा आपल्याला अधिकार असत नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
गॅसदाहिनी ३० सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील
मृत्यूनंतरचे विधी आणि कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यातच अंत्यसंस्कारासाठी लाकूड हा महत्त्वाचा घटक आहे. लाकडासाठी वृक्षांची कत्तल केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचे बराच नुक़सानही होते. एखाद्यावेळी लाकडाचा तुटवडा असल्यास मृतदेहाला अग्निडाग देण्यासाठी संबंधितांना बराच वेळ ताटकळत रहावे लागते. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रात सामाजिक आणि सेवा क्षेत्रात अगे्रसर असलेल्या केशवस्मृती सेवासंस्था समुहातर्फे गॅसदाहिनी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही गॅसदाहिनी ३० सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचेही प्रकल्पप्रमुख नंदू आडवाणी यांनी सांगितले.
 
दोन कोविड सेंटरशी संलग्न
शहरातील रायसोनी कॉलेज येथील जी.एम.फ़ाउंडेशन संचालित व छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथील भरारी फ़ाउंडेशन संचालित कोविड केअर सेंटर या दोन ट्रिपल सी सेंटरच्या कार्यातही खारीचा वाटा असल्याचे समाधानही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
 
रिखबचंद बाफना यांचा दातृत्वाचा हात
या गॅसदाहिनी प्रकल्पास येणार्‍या खर्चापैकी तब्बल ७५ टक्के खर्च जळगावचे प्रसिद्ध व्यापारी रिखबचंद बाफना उचलणार आहेत, असे सांगून आडवाणी म्हणाले की, बाफना यांंनी त्यांची सागवान शेती विकली होती. त्याबद्दल त्यांनी त्यांच्या गुरुंना सांगितले होते. पण असे करणे म्हणजे वृक्षांची कत्तल ठरेल असे सांगत गुरुंनी त्यांना त्याबद्दल प्रायश्‍चित्त घेण्यास सांगुन शव दाहिनी बसवण्यात मदत करण्याबाबत सूचविले होते. तो विचार मनात ठेवूनच बाफना हे गेल्या एक ते दीड वर्षांपासून प्रयत्न करीत होते. त्यातच त्यांना केशवस्मृती संस्थेच्या कार्याची ओळख होवून गॅसदाहिनीसाठी सहकार्य करण्याचे त्यांनी ठरविले, असेही नंदू आडवाणी म्हणाले.
 
गॅसदाहिनीसाठी अनेकांचे सहकार्य महत्त्वाचे
गॅसदाहिनीपूर्वी विद्युत दाहिनीचा सर्वांचा विचार होता. परंतु, त्याला लागणारा खर्च अधिक होणार असल्याने गॅसदाहिनीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे, मुंंबई आणि अमरावती येथे सर्व्हेक्षण करण्यात आले. तसेच मनपाचे तत्कालिन आयुक्त उदय टेकाळे यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीस १० ते १५ दिवस बाकी असतानाच या प्रकल्पास मंजुरी दिली. त्यानुसार चार महिन्यापूर्वींच संबंधित कंपनीला गॅसदाहिनीसाठी ऍडव्हांस रक्कम दिली आहे. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे प्रकल्पाचे काम बंद होते. परंतु, सध्या परिस्थिती बघता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत गॅसदाहिनी कार्यान्वित होईल, असा विश्‍वास आहे. सुरुवातीस एक युनिट आणण्यात येईल. तो कार्यान्वित झाल्यानंतर येणारा अनुभव पाहून दुसरे युनिट येईल. गॅसदाहिनी उभारण्यासाठी गुजराथी समाज मंडळाचे राजू दोशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केल्याचे नंदू आडवाणी म्हणाले.
 
अल्प दरात होणार अंत्यसंस्कार
गॅसदाहिनीसाठी लागणार्‍या खर्चाची उर्वरित २५ टक्के रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यातच केशवस्मृती सेवासंस्था समुहातील ज्येष्ठ सदस्य दिलीप चोपडा यांनी एका क्षणात तो खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे, असे सांगत आडवाणी म्हणाले, गॅसदाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी खर्च लागणार आहे. त्यामुळे एका अंत्यसंस्कारासाठी संबंधितास काही शुल्क लागू शकते. प्रत्येक मृतदेहावर अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेसाठी किमान दोन तास वेळ आणि एक गॅस सिलेंडर लागेल. या प्रकल्पाचे व्यवस्थापन राजेंद्र भालेराव हे पाहणार होते. परंतु, दुर्दैवाने अल्पशा आजाराने त्यांचे अकस्मात निधन झाले. हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
 
यावेळी निवासी संपादक दिनेश दगडकर, प्रशासकीय अधिकारी मोनाली लंगरे, विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे यांच्यासह सहकारी उपस्थित होते.