प्रतीक्षा संपली, अयोध्येत मंदिर निर्माण सुरू

    दिनांक : 05-Aug-2020
Total Views |
अयोध्या : दीर्घकाळ चाललेला लढा गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयात िंजकल्यानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थळी मंदिर निर्माणासाठी भूमिपूजन करण्यात आले. पाच शतकांची प्रतीक्षा अखेर संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा आनंददायी सोहळा पार पडला आणि कोट्यवधी रामभक्तांच्या इच्छेनुसार राम मंदिराचे निर्माण कार्य सुरू झाले. आजच्या भूमिपूजन सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महंत नृत्यगोपालदास यांच्यासह 170 विशेष आमंत्रित उपस्थित होते. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अभूतपूर्व सोहळा देशवासीयांनी दूरचित्रवाहिनीवर पाहून डोळ्यांत साठवून घेतला. भूमिपूजनासाठी 12 वाजून 44 मिनिटे आणि 44 सेकंद हा मुहूर्त होता. तो साधला गेला आणि रामभक्तांमध्ये आनंदाची लाट उसळली. रामभक्तांनी देशभर श्रीरामाची पूजाअर्चा केली, सामूहिक आरती केली, मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. भूमिपूजन सोहळ्यानिमित्त कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देशाच्या विविध भागात रामभक्तांनी आज आपापल्या गावांत, शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे फडकवले, पताका लावल्या, रांगोळ्या काढल्या, टाळेबंदीच्या नियमांचे पालन करत सामूहिक आरत्याही केल्यात. रामजन्मभूमी गुलामीतून मुक्त झाल्याचा अपूर्व सोहळा साजरा करताना रामभक्तांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला.
 
 

Ram_Janm_1  H x 
 
या अनुपम सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थितांच्या हस्ते एका टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात आले.
 
 
 
राम सर्वांचाच, सर्व रामाचे!
राम सर्वांचाच आहे आणि सर्व रामातच आहे. असा संदेश सर्वत्र दिला पाहिजे, असे सांगतानाच, राममंदिर हे भारताचा समृद्ध वारसा असून, या मंदिराच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेला प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देश जितका सामर्थ्यशाली होईल, तितकेच प्रेम या देशाला मिळेल आणि येथे शांतता नांदेल, असे त्यांनी श्रीरामाचा संदेश उद्धृत करताना सांगितले. सामाजिक सलोखा हा प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रशासनाचा गाभा होता. देशाला एकत्रित आणण्यासाठी राममंदिराचे बांधकाम हे एक साधन असून, यामुळे देशातल्या सर्वच क्षेत्रांतील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असेही ते म्हणाले.
 
 
 

Modi_1_1  H x W 
राममंदिराच्या उभारणीसाठी आपण दगडांसोबतच परस्पर प्रेम आणि बंधुत्व जोडणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तुटणे आणि पुन्हा उभे राहणे या चक्रातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. आता रामललासाठी एका भव्यदिव्य मंदिराचे निर्माण होईल. असे त्यांनी सांगितले.
 
 
श्रीराम देशवासीयांच्या मनात आहेत. कोणतेही काम करायचे असल्यास प्रेरणा म्हणून श्रीरामाकडे पाहिले जाते. राममंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे. प्रभू रामचंद्राकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान आहे. आज श्रीरामाचा जयघोष केवळ रामाच्याच भूमीत नाही तर, संपूर्ण जगभरात घुमत आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. हे राममंदिर अनंत काळपर्यंत मानवाला प्रेरणा देत राहील.
 
 
श्रीरामाचा संदेश जगभरात निरंतर पोहोचवण्याची जबाबदारी
आपल्या वर्तमानातील आणि भावी पिढ्यांवर आहे, असेही त्यांनी सांगितले. भारताची आध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर म्हणजे ऐक्याचे प्रतीक आहे. श्रीराम हजारो वर्षांपासून भारताचे आधारस्तंभ आहेत. श्रीरामाचे नाव असलेल्या शिळा देशातील अनेक भागांतून आल्या, त्या एक ऊर्जा निर्माण करीत आहेत. कोरोनामुळे हा कार्यक्रम काही मर्यादांचे पालन करून घ्यावा लागत आहे. श्रीरामाच्या कार्यक्रमासाठी मर्यादांचे पालन करून झाले पाहिजे तसेच देशातील नागरिकांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला होता. संयम दाखविला होता. तसेच आचरण आपले असले पाहिजे. या मंदिरासोबत केवळ नवा इतिहासच नव्हे तर, इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, असे त्यांनी सांगितले.