30 वर्षांचा संघर्ष सार्थकी लागला - सरसंघचालक डॉ. भागवत

    दिनांक : 05-Aug-2020
Total Views |
संकल्पपूर्तीचा आनंद मिळाला
अयोध्या : आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा आहे. आम्ही सर्वांनीच एक संकल्प केला होता. मला आजही आठवते की, आमचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरसजी यांनी, आम्हा सर्वांनाच हे पाऊल पुढे टाकण्यापूर्वी असे सांगितले होती की, अतिशय मेहनतीने 20 ते 30 वर्षेपर्यंत आपल्याला काम करावे लागेल, तेव्हाच त्याची पूर्तता होईल. आम्ही 20-30 वर्षे परिश्रम घेतले आणि तिसाव्या वर्षाच्या सुरुवातीला आम्हाला या संकल्पपूर्तीचा आनंद मिळाला. आज तीस वर्षांचा संघर्ष सार्थकी लागला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज बुधवारी येथे केले. राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांना उद्‌बोधन करीत होते.
 
 
 
Mohanji_1_1  H
 
सर्वांनीच अथक परिश्रम घेतले, अनेकांनी प्राणाहुतीही दिली. ते सर्वच आज येथे सूक्ष्म रूपात उपस्थित आहेत. अनेक जण असेही आहेत, जे या सोहळ्यात प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकत नाहीत, परिस्थितीमुळे ते येऊ शकत नाहीत. रथयात्रेचे नेतृत्व करणारे अडवाणीजी आपल्या निवासस्थानी हा ऐतिहासिक सोहळा पाहात आहेत. किती तरी लोक असे आहेत, जे येथे येऊ शकले असते, पण परिस्थितीच अशी आहे की, त्यांना इच्छा असूनही बोलावता आले नाही. तेदेखील आपापल्या घरी राहून हा सोहळा पाहात आहेत. देशभरात सर्वत्र आनंदाची लाट असल्याचे मी पाहात आहे. अनेक दशकांची अपेक्षा पूर्ण झाल्याचा हा आनंद आहे, असे मोहनजी म्हणाले.
 
 
 
 
आज सर्वांत मोठा आनंद हा आहे की, भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आणि आत्मभानाची गरज होती, त्याचा सगुण-साकार अधिष्ठान होण्याचा शुभारंभ आज झाला आहे. हे अधिष्ठान आहे त्या आध्यात्मिक दृष्टीचे! ‘सिया राममय सब जग जानहि ।’ अर्थात्‌, संपूर्ण विश्वाला आपल्यात पाहणे आणि स्वत:ला विश्वात पाहण्याची भारताची दृष्टी आहे. याच कारणामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचा व्यवहार आजही जगात सर्वाधिक सज्जनतेचा असतो आणि या देशाचा संपूर्ण जगासोबत एकसारखाच व्यवहार असतो. ‘वसुधैव कुटुम्बकम्‌’ हाच भारताचा सिद्धांत आहे. असा स्वभाव आणि त्याला अनुसरून आपल्या कर्तव्यांचे पालन करून, व्यावहारिक जगातील सर्व समस्यांमधून मार्ग काढत, जितके शक्य आहे, त्या प्रमाणात सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी संहिता तयार होत असते, त्याचे अधिष्ठान आज येथे पार पडत आहे. सर्व वैभवांनी संपन्न आणि सर्व जगाचे कल्याण करणार्‍या भारताच्या निर्मितीचा शुभारंभ आज त्या हातांनी होत आहे, ज्यांच्याजवळ या निर्मितीच्या व्यवस्थेचे नेतृत्व आहे आणि ही बाब आणखीच आनंदाची आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
 
 
 
अशोक िंसघल यांचे स्मरण
आज सर्वांनाच स्मरण होत असेल आणि स्वाभाविक विचारही मनात येत असेल की, अशोकजी िंसघल आज येथे असते, तर किती चांगले झाले असते. पू. महंत रामचंद्रदास परमहंसजी आज असते, तर किती चांगले असते. मात्र, त्या परमेश्वराची जी इच्छा असते, तेच घडत असते. माझा असा विश्वास आहे की, जे येथे आहेत, ते आपल्या मनातून आणि जे नाहीत, ते सूक्ष्म रूपात येथे त्या आनंदाचा केवळ अनुभवच घेत नसतील, तर हा आनंद शेकडो पटीने वाढवतही आहेत. या आनंदात एक प्रेरणा आहे, उत्साह आहे.
 
 
 
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्पृथिव्यां सर्वमानवाः।
 
 
 
आपल्याला सर्वांना जीवन जगण्याचे शिक्षण द्यायचे आहे. आता कोरोना संकटाचा काळ आहे. संपूर्ण जग एकच विचार करीत आहे की, नेमके काय चुकले आणि यातून पुढचा मार्ग कसा निघेल. जगाने दोन मार्ग बघितले, आता आणखी तिसरा मार्ग आहे का, यावर विचार केला जात आहे. याचे उत्तर ‘होय’ असे आहे. हा मार्ग आमच्याकडे आहे. तो आम्ही जगाला देऊ शकतो आणि तो दाखविण्याचे कामही आपल्यालाच करावे लागणार आहे. याची तयारी करण्याचा संकल्प करण्याचाही आजचाच दिवस आहे आणि यासाठी आवश्यक असतो पुरुषार्थ! हे एक व्रत आहे व ते आपण केले आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनापासून आतापर्यंत जर आपण पाहिले, तर असे दिसेल की, तो पुरुषार्थ, पराक्रम, वीरवृत्ती आपल्या शरीरात ठासून भरली आहे. आपण ते गमावले नाही, आपल्याजवळच आहे. आपण पुढाकार घेतला, तर नक्कीच यश मिळेल. हा विश्वास आणि प्रेरणा आपल्याला आजच्या याच दिवसापासून मिळते, याला कुणीच अपवाद असू शकत नाही, कारण आपल्या सर्वांमध्येच राम आहे, असे ते म्हणाले.
 
 
 
अयोध्येला मनात सजवायचे आहे
आता अयोध्येतील या जन्मभूमीत भगवान रामाचे भव्य मंदिर उभे राहणार आहे. प्रक्रिया सुरू झाली आणि जबाबदार्‍याही सोपविण्यात आल्या आहेत. प्रत्येकच जण आपले कर्तव्य पार पाडणार आहे. आता आपल्या सर्वांनाच अयोध्येला मनात बसवायचे आहे, सजवायचे आहे. या महान कार्यासाठी भगवान राम ज्या धर्माचे प्रतीक मानले जातात, तो सर्वांना जोडणारा, विकास करणारा आणि सर्वांना आपला समजणारा धर्म आहे, त्या धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण जगाला सुख आणि शांतता प्रदान करणारा भारत आपल्याला घडवायचा आहे. यासाठी आपल्याला मनात अयोध्या बसवायची आहे. येथे जसजसे मंदिर बनेल, तसतशी आपल्या मनातही अयोध्या फुलायला हवी. रामाचे मंदिर पूर्ण होण्यापूर्वी आपले मनमंदिर पूर्ण व्हायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. हे मनमंदिर कसे असावे, याविषयी तुलसीदाज यांनी रामचरितमानसमध्ये सांगितले आहे.
 
 
काम कोह मद मान न मोहा। लोभ न छोभ न राग न द्रोहा।
जिन्ह कें कपट दंभ निंह माया। तिन्ह कें हृदय बसहु रघुराया
जाति पॉंति धनु धरमु बड़ाई। प्रिय परिवार सदन सुखदाई।
सब तजि तुम्हहि रहइ उर लाई। तेहि के हृदयँ रहहु रघुराई।
 
 
आपले हृदय रामाचे घरच असायला हवे. सर्व दोष, विकार, द्वेष आणि शत्रुत्वापासून मुक्त होऊन, जगाचा मायाजाळ कसाही असो, त्यात सर्व प्रकारचे व्यवहार करण्यासाठी ते समर्थ असावे. हृदयातील सर्व प्रकारच्या पक्षपाताला दूर करून, केवळ आपल्या देशासाठीच नाही, तर संपूर्ण जगाला स्वीकारण्याची क्षमता ठेवणारा या देशातील व्यक्ती व समाज निर्माण करण्याचे हे कार्य आहे. या समाजाची निर्मिती करणारा एक सगुण साकार प्रतीक येथे उभारले जाणार आहे. हे प्रतीक आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहणार आहे. राममंदिर बांधण्याचे कार्य भारतवर्षातील लाखो अन्य मंदिरांप्रमाणे फक्त आणखी एक मंदिर बनविण्यासारखे नाही, तर देशातील सर्व मंदिरांमध्ये स्थापित मूर्तींचा जो आशय आहे, त्याचे पुनर्प्रकटीकरण आणि पुनर्स्थापनेचा शुभारंभ आज येथे अतिशय सशक्त हातांनी झाला आहे. या मंगलमय पर्वावर, या आनंदाच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांचेच अभिनंदन करतो, असेही डॉ. मोहनजी म्हणाले.