अयोध्या रेल्वे स्थानकाचे संपूर्ण स्वरूपच पालटणार

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे होणार पुनर्बांधणी
 
 
नवी दिल्ली : श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात होईल. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणे नव्या रूपात सजली आहेत. यात आता तेथील रेल्वे स्थानकाचीही भर पडली आहे. आता अयोध्येच्या रेल्वे स्थानकाचे संपूर्ण स्वरूपच पार बदलण्यात येणार आहे. श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या रूपात या रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने निधीमध्ये भरघोस वाढही केली आहे.
 
 
 
Ayodhya-railway-station_1
 
 
प्रत्यक्ष श्रीराम मंदिर तयार होण्यापूर्वीच पुढील दोन वर्षांत अयोध्यावासीयांना मंदिराच्या प्रतिकृती स्वरूपात नवीन रेल्वे स्थानकाची भेट मिळणार आहे. या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी रेल्वेने अर्थसंकल्पात वाढ केली असून, आर्थिक तरतूद 80 कोटींवरून 104 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
 
यासंदर्भात रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी टि्‌वट केले होते. कोट्यवधी भाविक श्रीराम मंदिराला भेट देण्यासाठी येतील. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याचे ठरविले आहे, असे यात त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
सध्याच्या अयोध्या स्थानकाची रचना ही देखील मंदिराप्रमाणेच आहे. काही वर्षांपूर्वीच त्याच्या पुनर्विकासाचा निर्णय झाला होता. त्यानंतर आता याचा नवीन आराखडा नवीन श्रीराम मंदिराच्या पृष्ठभूमीवर असणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसुविधांबरोबरच मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी हाताळण्यासाठी क्षमताही वाढवण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास दोन टप्प्यात केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थानकामधील प्लॅटफॉर्मचा भाग विकसित केला जाईल. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात स्थानकाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होईल. यामध्ये अनेक प्रसाधन गृह, शयनगृह, तिकीट खिडक्या आणि मोकळी जागा असणार आहे.