भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण इक्बाल अन्सारींना

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
 
 
मी उपस्थित राहावे, ही प्रभू रामचंद्रांचीच इच्छा
 
 
 
अयोध्या : राममंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण अयोध्या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना पाठविण्यात आले आहे. या सोहळ्याला मी उपस्थित राहावे, ही कदाचित प्रभू रामचंद्रांचीच इच्छा असावी, अशी प्रतिक्रिया यावेळी अन्सारी यांनी दिली.
 

Ram-Invitation_1 &nb 
 
 
 
मी भूमिपूजनाला जाणार आहे आणि तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, त्यांना रामनाम लिहिले असलेली शाल आणि रामचरित्रमानसची प्रत भेटीदाखल देणार आहे.
 
 
 
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव महंत चंपत राय यांनी अन्सारी यांना या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका दिली. होय, मला पत्रिका प्राप्त झाली असून, मी अतिशय आनंदात आहे. बुधवारी या सोहळ्याला मी उपस्थित राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्या वाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे, असे अन्सारी यांनी सांगितले.
 
 
 
इक्बाल अन्सारी यांच्यासह अन्य एक मुस्लिम पक्षकार हाजी महबूब आणि बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे.
 
 
मी नेहमी साधुसंतांमध्ये राहिलो आहे. माझ्या मनात प्रभू रामचंद्रांविषयी आदर आहे. कदाचित भगवान रामांची इच्छा असावी की, त्यांच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहावे आणि म्हणूनच मला पहिले निमंत्रण मला मिळाले, मी याचे स्वागत करतो. आता वादाचा कुठलाच मुद्दा नाही. माझे असे स्पष्ट मत आहे की, अयोध्येचा चांगला विकास व्हावा, आपल्या भावी पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित राहावे, त्यांना रोजगार मिळावा. नव्या पर्वाची सुरुवात आपणच करायला हवी, असेही अन्सारी म्हणाले.
 
 
 
गणपती पूजनाने झाली सोहळ्याला सुरुवात
अयोध्येत भूमिपूजन बुधवारी होणार असले, तरी या सोहळ्याची सुरुवात आज सोमवारपासून सुरू झाली आहे. आज सकाळी 9 वाजता गणपतीपूजन झाले. उद्या, मंगळवारी रामर्चा पूजन होईल. ही पूजा सकाळी 9 वाजता सुरू होईल व ती सुमारे पाच तास चालेल. यात 6 पुजार्‍यांचा समावेश असेल.