अभिव्यक्ती आणि नियंत्रणाचेही तारतम्य...

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
 
 
 
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या संदर्भात नियमित चर्चा झडावी, असे काहीतरी होत असते. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये, या मताचे सगळेच असतात. मात्र, याबाबत ‘आपला तो बाब्या अन्‌ दुसर्‍याचा तो बंड्या,’ असेच भूमिकांचे ध्रुवीकरण सोयिस्कर रीत्या केले जात असते. आमची ती निकोप अभिव्यक्ती आणि दुसर्‍याने केले तर ते चारित्र्यहनन असते. आताचा मुद्दा मात्र एकदम अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीवर नेण्यासारखा अजिबातच नाही. इतके मात्र नक्की की, अभिव्यक्त होताना तारतम्य ठेवलेच पाहिजे, तसेच त्यावर नियंत्रण ठेवतानाही ते ठेवलेच पाहिजे. तारतम्य, विवेक यातूनच निकोप अशी निर्मिती होऊ शकते. यावेळी संरक्षण खात्याने माहिती व प्रसारण खाते आणि केंद्रीय चित्रपट नियंत्रण मंडळाला (सेन्सॉर) एक पत्र दिले आहे. भारतीय लष्कर आणि त्या संदर्भातल्या घटनांचे चित्रीकरण असलेल्या चित्रपट, मालिका, वेब मालिका यांना आता संरक्षण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक करण्यात यावे, अशी मागणी त्या पत्रात करण्यात आली आहे. ती मागणी मान्य होऊन तो नियम- कायदा होण्यात तसे काही अंतर नाही. बरे, ही मागणी अवाजवी आहे, असेही नाही. त्या संदर्भात अगदी संदर्भासहित तक्रारी आल्या असल्याने त्यावर फार विचार करण्याचेही काही कारण नाही. मात्र, अशा काही निर्णयांपाशी थोडे थांबून विचार नक्कीच करायला हवा. कारण, एकदा असे नियम सारासार विचार न करता झाले की, मग पुढे त्याची अडचण निर्माण होते. प्राण्यांच्या संदर्भातही असेच झालेले आहे. मनेका गांधी या भूतदयावादी नेत्या मंत्री असताना त्यांनी, प्राण्यांचे खेळ करू नयेत अन्‌ मग चित्रपटांतही प्राणी चित्रीकरणासाठी वापरले जाऊ नयेत, असा कायदा केला. वापरायचे असेल तर ‘पेटा’ या संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असा कायदा केला. चित्रपट हे मानवी जगण्याच्याच कहाण्या असतात आणि मग त्यात प्राणी हे त्याचे सहचरच असतात. मग त्यांना टाळून कसे चालायचे? शेतकरी दाखवायचा अन्‌ तो बैलाने नांगरताना नाही दाखवायचा म्हणजे काय? असे कायदे मग इतके उगा सोवळेपणाचा आव आणून पाळले जातात की मग हास्यास्पद होते. पु. ल. देशपांडेंवरच्या चित्रपटात, पु. ल. आणि वसंतराव देशपांडे कुठूनसे बैलगाडीतून येतानाचे चित्रीकरण होते. त्यात बैल दाखविले, त्यांच्या खांद्यावर जूदेखील आहे, म्हणजे प्राण्यांचा हा छळच आहे म्हणून चित्रपटाचे सेन्सॉर अडविण्यात आले होते...
 
 

Indian_Army_1   
 
नेमके असेच काही या नव्या नियमाने होऊ नये, याची काळजीही घेतली जायला हवी. एक नक्की की, भारतीय चित्रपटांत आतावर कधी लष्कराची प्रतिमा मलिन होईल, असे काही कथानक चित्रित करण्यात आलेले नाही, असे ठामपणे म्हणता येते. दूरचित्रवाणी मालिकांचे विषय लष्कराच्या संदर्भातले असावेत इतक्या भारतीय टीव्ही मालिका प्रगल्भ झालेल्या नाहीत. चित्रपटांत तर निवृत्त सैनिक हा नायकच असतो िंकवा तो नायकत्वाचीच कामगिरी करताना दाखविण्याची प्रथाच आहे. एक मात्र नक्की की भ्रष्टाचार, अनाचार या गोष्टींपासून लष्करही दूर असते असे नाही. संरक्षण सामग्री खरेदी घोटाळ्यांची तर अगदी नेहरूंच्या मंत्रिमंडळापासूनच मालिका आहे. एखादा सैनिक दुसर्‍या देशाला विकला गेल्याच्याही बातम्या कधीमधी येतातच... पण, याचा अर्थ अलीकडच्या वेब मालिकांमध्ये भारतीय लष्कराचे ज्या पद्धतीने खुलेआम वस्त्रहरण केले जाते आहे, इतकी खालची पातळी भारतीय लष्करात आणि एकुणातच जगभराच्या सैनिकी जगतात गाठली जातच नाही. एम. एक्सएक्स अनसेन्सॉर्ड या मालिकेत खरोखरीच लष्कराचे अगदी बॉलीवूडपटांमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांची प्रतिमा पार घाण करून टाकण्यात आली आहे (अर्थात ते सारे खोटे होते असे अजिबात नाही) त्या दर्जाहीन पद्धतीने भारतीय लष्कराच्या संदर्भात या वेब मालिकेत दाखविले जात आहे. त्यामुळे त्यावर असे नियंत्रण हवेच. अनेकदा अशा चित्रपट, मालिकांमध्ये लेखक आणि दिग्दर्शकाच्या त्या क्षेत्राच्या अज्ञानामुळे चुकीचे काही दाखविले जाते. चित्रपट या माध्यमाचे स्वातंत्र्य म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. त्यात मग अवास्तव अशी माहिती नकळत प्रसारित केली जाते. अगदीच जवळचे उदाहरण द्यायचे झाल्यास न्यायालयीन खटल्याचे कामकाज चित्रपटांत दाखवितात तसे अजिबातच वास्तवात होत नाही. इतके शैलीबाज वकील आणि क्षणाक्षणाला ‘ऑर्डर- ऑर्डर’ करणारे न्यायाधीशही वास्तवात नसतात... लष्करी दैनंदिनीबद्दल लेखक त्या क्षेत्रातला असला िंकवा त्या कुटुंबातला असला, तरच नेमकेपणाने चित्रपटमाध्यमात ते उतरू शकते. लष्करी अधिकारी म्हणजे अत्यंत कडक, जाडजूड मिश्यांंचा अशीच काहीशी प्रतिमा चित्रपटांत दिसते. ते हळवेही असू शकतात/असतात, अगदी चॉकलेट हिरोसारखाही एखादा अधिकारी असू शकतो, हे चित्रपटकर्त्यांना कळत नसावे िंकवा मग नायकच लष्करी अधिकारी दाखवायचा झाला तरच कळत असावे. एकुणात, हा नियम करतानाही तारतम्य बाळगले जावे. उद्या पोलिस आणि राजकीय पक्षांनीही, आमच्या संदर्भात दृक्‌श्राव्य मालिकांमध्ये काही दाखविताना आमचेही ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, अशी मागणी केली तर दृक्‌श्राव्य माध्यमांचा व्यवसायच बंद व्हायचा!
 
 
लष्कराच्या संदर्भात चित्रपट, माहितीपट, मालिका, वेब मालिकांचे तर ठीक आहे; पण या निमित्ताने बातम्यांचाही अन्‌ विशेषत्वाने वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांचाही विचार केला जायला हवा. इतर वेळी लष्कराच्या जनसंपर्क खात्याकडून बातमी आल्यावरच ती प्रसारित केली जाते. म्हणजे किमान मुद्रित माध्यमांमध्ये तर हे नक्कीच होते. मात्र, वृत्तवाहिन्यांच्या बातम्या ताळतंत्र सोडलेल्या असतात तोवर ठीक आहे. पण, नीती-नियमांनाही तिलांजली दिली गेलेली असते तेव्हा मात्र डोक्यात जाते. देशाच्या, प्रांताच्या सुरक्षेच्या संदर्भात एखाद्या घटनेचे वार्तांकन करताना आणि ते प्रसारित करताना तारतम्य बाळगायचे असते, हे भारतीय वृत्तवाहिन्यांना माहितीच नाही. काही सबसे तेज वाहिन्या तर झणझणीत बातम्यांची पोकळी भरून काढण्यासाठी काही कारण नसताना कॅमेरा घेऊन लष्करी तळांवर पोहोचतात आणि काही गरज नसताना- ‘‘देखो कैसे करते है फौजी कवायत’’, ‘‘देखो फौजी खाना बना रहे है...’’ असे दाखवितात. अरे कशाला? मध्यंतरी चीनसोबत तणावाचा तर या वाहिन्यांनी मेलोड्रामा करून टाकला होता. हे कॅमेरे घेऊन लडाखमध्ये शिरले आणि मग आपली संरक्षणसिद्धता अगदी बारीकसारीक तपशिलांसह सांगत बसले. ‘‘हमारे पास यौं है अन्‌ त्यों है...’’ हे सांगण्याची काही गरज आहे का? अन्‌ मग त्या वेळी भारतीय लष्कर कशी काय परवानगी देते त्यांना? की केवळ अधिकारी, सैनिक यांचीच प्रतिमा सांभाळायची आणि काही गुपितांच्या ब्रेिंकग बातम्या झाल्या तरीही चालतात? मागे मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा हॉटेल ताज आणि इतर काही ठिकाणांवर लष्कराची कारवाई सुरू असताना या वृत्तवाहिन्यांवर ‘सबसे पहले हमारेही चॅनेलपर’ची अहमहमिका सुरू होती. इतक्या सूक्ष्म तपशिलांसह हे वार्तांकन प्रसारित केले जात होते की, पाकिस्तानात बसून या दहशतवाद्यांचे नियंत्रण करणार्‍या त्यांच्या आकांना खडान्‌खडा माहिती सहज, विनासायास आणि फुकट मिळत होती. जगभरात देशाचे सुरक्षेच्या संदर्भात प्रतिमास्खलन होत होते ते वेगळे. धंदेवाईक वृत्तवाहिन्यांनी हे तारतम्य बाळगू नये अन्‌ तेही भारतीय वृत्तवाहिन्यांनी, ते समजू शकते; पण सुरक्षादलापासून इतर कुणीही त्या वेळी ते रोखण्याची मागणी केली नाही. अमेरिकेतील ट्वीन टॉवरवर हवाई हल्ला केल्याच्या घटनेत न्यू यॉर्कच्या महापौरांनीच तत्काळ वाहिन्यांना आवाहन केले आणि क्षणात बातम्या थांबल्या. टॉवर कोसळतानाचे पहिले एकच छायाचित्र पहिल्या दोन मिनिटांत प्रसारित झाले होते तेच काय ते जगभर होते... लष्करासंदर्भात कथानक असलेल्या दृक्‌पटांपेक्षाही या बातम्या जास्त घातक आणि प्रतिमाभंजन करणार्‍या आहेत. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात आपण या पातळीवर संवेदनक्षम असलो पाहिजे. तारतम्यही बाळगले पाहिजे. उद्या डॉक्टर, शिक्षक, वकील... अशा अनेक सेवाभावी पेशाधारकांनी असलीच मागणी केली तर कसे?