रामलल्लासाठी विशेष हिरेजडित वस्त्र

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
शंकरलाल, भगवतलाल बंधूंचे श्रम फळाला लागणार
 
 
अयोध्या : येत्या बुधवारी राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या काळात प्रभू रामचंद्रांना विशेष हिरेजडित वस्त्र घालण्यात येणार आहे. शंकरलाल आणि भगवतलाल पहाढी हे दोन िंशपी गेल्या तीन दशकांपासून रामलल्लासाठी वस्त्र शिवत आहेत. त्यांनीच शिवलेले वस्त्र प्रभू रामचंद्रांना घातले जाणार आहेत. विशेष म्हणजे, हे वस्त्र हिरेजडित असणार आहेत. त्यावर नऊ हिरे जडण्यात येणार आहेत.
 

Shankarla-Bhagwatlal_1&nb 
 
 
हे बंधू फक्त देवी-देवतांसाठीच वस्त्र तयार करीत असतात. अयोध्येतील एका भागात त्यांचे लहानसे दुकान आहे. शंकरलाल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, माझे वडील बाबुलाल यांनी 1985 पासूनच रामलल्लाचे वस्त्र शिवत आले आहेत. ते अनेकदा आपली शिलाई मशिन घेऊन रामजन्मभूमीत यायचे आणि तिथेच बसून, पुजार्‍यांच्या इच्छेनुसार वस्त्र शिवायचे. त्यांच्यासोबत आम्हीदेखील बसायचो आणि त्यांचे काम बारकाईने पाहात होतो. तेव्हापासूनच आम्ही फक्त रामलल्लासाठी वस्त्र शिवण्याचे काम सुरू केले.
 
 
रामलल्लांच्या वस्त्रांसाठी आम्ही अतिशय मऊ कापडांची निवड केली आहे. बहुतांश मखमलीचा वापर करण्यात आला आहे. रामलल्ला हे भगवान श्रीरामांचे बालरूप असल्याने, आम्ही त्यांची वस्त्र जास्तीतजास्त मऊ कसे असतील, यावर भर दिला आहे.
 
 
पहिले हिरवे वस्त्र घालणार
भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. सर्वप्रथम रामलल्लांना हिरवे वस्त्र परिधान केले जाणार आहे. पूजेच्या दुसर्‍या टप्प्यात त्यांना केशरी रंगाचे वस्त्र घातले जाईल. हे दोन्ही रंगांचे वस्त्र तयार करण्यात आले असल्याचे या भावडांनी सांगितले.