कोरोनाचा पहिला राजकीय बळी!

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
 
 
 
दिल्ली दिनांक
 
- रवींद्र दाणी
 
 
 
‘‘मी कुणालाही आवडत नाही!’’ हे विधान आहे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीचे! अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे! 3 नोव्हेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्प हे कोरोनाचे बळी ठरण्याचे स्पष्ट संकेत आहेत. जेव्हा केव्हा कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल- दोन राष्ट्राध्यक्षांची नावे काळ्याकुट्ट अक्षरांनी लिहिली जातील. एक म्हणजे राष्ट्रपती ट्रम्प आणि दुसरे नाव आहे ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो! कोरोनात सध्या हे दोन देश आघाडीवर आहेत. त्याच वेळी दोन देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल- न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेिंसडा अर्डन आणि जर्मनीच्या चान्सलर अॅन्जेला मर्केल!
 
 
 
Trump-Biden_1  
 
 
ट्रम्प यांचे दु:ख
अमेरिकेत दीड लाखांवर बळी घेणार्‍या कोरोनाची दाहकता राष्ट्रपती ट्रम्प यांना आता जाणवू लागली आहे. कारण, सार्‍या जनमत चाचण्या ट्रम्प यांच्या विरोधात जात आहेत. बहुतेक सर्व जनमत चाचण्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोसेफ बायडन यांना चांगली आघाडी दिली आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या जसजशी वर जात आहे, राष्ट्रपती ट्रम्प यांचा ग्राफ खाली येत आहे. बहुधा यातून ट्रम्प यांनी, ‘‘मी कुणालाच आवडत नाही!’’ असे विधान केले असावे.
 
 
बेदरकार, बेजबाबदार
कोरोनासारखे भयावह संकट राष्ट्रपती ट्रम्प यांनी अतिशय बेदरकारपणे हाताळले. 25, 26 फेब्रुवारी रोजी ट्रम्प भारतभेटीवर होते. 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी नवी दिल्लीत पत्रपरिषद घेतली. आपण पुन्हा निवडून आल्यावर जगाचा शेअर बाजार कसा उसळणार आहे, हे त्यांनी सांगितले. भारतभेट आटोपून मायदेशी परतण्यासाठी ते विमानात बसले आणि अमेरिकेतील शेअर बाजार कोसळल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्या एका सल्लागाराने, कोरोनाप्रकरण गंभीर असल्याचे विधान केले होते आणि त्याने शेअर बाजार कोसळला होता. वॉिंशग्टनला पोहोचताच त्यांनी आपल्या सल्लागाराचा समाचार घेतला आणि कोरोना प्रकरण काहीच नाही, असे सांगितले. प्रारंभी, तर कोरोनाला संकट मानावयास ते तयार नव्हते. राज्याराज्यातील डेमोक्रॅटिक पक्षांचे गव्हर्नर टाळेबंदी घोषित करीत असताना, ट्रम्प मात्र ‘ओपन अप अमेरिका’ असे कार्यक्रम करीत होते. न्यू यॉर्कचे गव्हर्नर अॅण्ड्र्यू क्युमो यांच्याशी त्यांची दररोज झडणारी जुगलबंदी उपहासाचा विषय ठरत होती.
 
 
डॉ. विल्यम फॉकी
राष्ट्रपती ट्रम्प यांची ताजी हताशा व निराशा यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यापेक्षा, त्यांचे आरोग्यविषयक सल्लागार डॉ. विल्यम फॉकी यांच्या लोकप्रियतेचे रेिंटग अधिक आहे. डॉ. फॉकी हे अमेरिकेच्या संशोधन क्षेत्रातील फार मोठे नाव. त्यांना अमेरिकेतील डॉ. अब्दुल कलाम म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. 80 वर्षे वयाचे डॉ. फॉकी मागील 40 वर्षांपासून प्रत्येक राष्ट्रपतींचे संसर्गजन्य आजारांसंबंधीचे सल्लागार आहेत. राष्ट्रपती रिपब्लिकन पक्षाचा असो वा डेमोक्रॅटिक पक्षाचा असो, त्यांचे सल्लागार डॉ. फॉकी हेच राहणार. साधी शरीरयष्टी, साधा चेहरा व साधी राहणी यासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. फॉकी सध्या अमेरिकन जनतेत हिरो ठरले आहेत. त्यांची छायाचित्रे असलेली टी-शर्टस्‌ बाजारात आली आहेत. अमेरिकन युवक-युवती यांच्यासाठी डॉ. फॉकी रोल मॉडेल ठरत आहेत. पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत काम करीत त्यांनी अमेरिकेला या संकटातून वाचविण्यासाठी कसे प्रयत्न केलेत, हे सांगितले जात आहे. कोरोनाबाबतीत ते जे काही सांगत होते, ते सारे खरे ठरत आहे. यातून त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि त्यांचा सल्ला झुगारणार्‍या ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागत गेली. राष्ट्रपती ट्रम्प यांच्या बाजूला उभे राहून त्यांच्या विधानाचे खंडन करण्याचे साहस डॉ. फॉकी करीत होते. राजकारणाशी माझा संबंध नाही. मी फक्त विज्ञानाच्या आधारे बोलणार, असे ते सांगत होते. अमेरिकेतील स्थिती गंभीर होत असतानाही डॉ. फॉकी यांचा शांत चेहरा अमेरिकन जनमानसाला प्रभावित करून गेला. अमेरिकेत कोरोना नावाचे वादळ घोंघावत असताना डॉ. फॉकी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अमेरिकेला मार्गदर्शन करीत राहिले.
 
 
मुखाच्छादनाची थट्‌टा
राष्ट्रपती ट्रम्प कितीतरी दिवस मुखाच्छादन (मास्क) घालण्यास तयार नव्हते. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोसेफ बायडन यांनी मुखाच्छादन घातल्यावर, त्यांना ते छान दिसते, अशी थट्‌टा त्यांनी केली. मुखाच्छादन घालण्यास विरोध करणारे ते एकमेव राष्ट्रपती होते. नंतर व्हाईट हाऊसमध्ये होणार्‍या पत्रपरिषदेत ते आपल्या सल्लागारांचेच खंडन करीत होते. या सार्‍याचा परिणाम आता दिसून येत आहे.
 
 
1992 नंतर प्रथमच
नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत झाल्यास, राष्ट्रपतिपदावर असणारी व्यक्ती पराभूत होण्याची 1992 नंतरची ही पहिली घटना असेल. 1980 ते 1988 अशी सलग आठ वर्षे राष्ट्रपतिपद गाजविणार्‍या रोनाल्ड रेगन यांच्यानंतर निवडणूक जिंकणारे सीनियर बुश 1992 मध्ये पदावर असताना पराभूत झाले होते. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बिल क्लिटंन यांनी त्या वेळी बाजी मारली होती. यावेळी पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाला ती संधी मिळू शकते.
 
 
ताजी चाचणी
अमेरिकेतील वेगवेगळ्या जनमत चाचण्यांनी प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षांनुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बायडन यांना जवळपास सर्व प्रमुख राज्यांमध्ये राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर आघाडी मिळाली आहे आणि ही आघाडी 1-2 टक्क्यांची नाही, तर चांगली 7-8 टक्क्यांची आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. अशा स्थितीत ट्रम्प यांची फेरनिवड कठीण मानली जात आहे. कोरोना प्रकरण घडले नसते तर ट्रम्प यांचा विजय निश्चित मानला जात होता. अमेरिकेतील बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांनी केलेली उपाययोजना आणि चीनसोबत त्यांनी घेतलेली संघर्षाची भूमिका अमेरिकन जनतेला आवडू लागली होती. मात्र, कोरोना प्रकरणाने सारेच चित्र बदलले.
 
 
अमेरिका कमजोर
चीनच्या विरोधात अमेरिका कमजोर पडत आहे, याचा स्पष्ट संकेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांच्या एका विधानातून मिळत आहे. चीनबाबत आमची भूमिका चुकली, हे त्यांनी स्पष्ट शब्दांत मान्य केले आहे. 1972 पर्यंत चीन-अमेरिका यांच्यात फारसे व्यापार संबंध नव्हते. मात्र, राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्या पुढाकाराने हे संबंध सुरू झाले. मागील 50 वर्षांत आम्ही चीनबाबत जी भूमिका घेतली ती एकप्रकारे चुकीची ठरली आहे, असे सांगत पोम्पियो यांनी चीनच्या विरोधात आता लोकशाहीवादी देशांची युती तयार झाली पाहिजे, असे प्रतिपादन केले आहे. याचा अर्थ रशिया-चीन युती अमेरिकेला भारी पडत आहे. अमेरिकेला मित्रराष्ट्रांची गरज भासू लागली आहे. सोव्हिएट युनियनच्या पतनानंतर सार्‍या जगावर जरब बसविणार्‍या अमेरिकेच्या वर्चस्वाला प्रथमच आव्हान मिळाले आहे.
 
 
15 डिसेंबर 1995!
अमेरिकन राष्ट्रपती आता भारत-अमेरिका सहकार्याची, प्रगाढ संबंधाची भाषा बोलत आहेत. पण, भारताला 15 डिसेंबर 1995 चा दिवस कसा विसरता येईल? फ्रँक विन्सर हे अमेरिकेचे भारतातील राजदूत होते. एक मातब्बर मुत्सद्दी, अशी त्यांची ओळख होती. मात्र, त्यांचा चेहरा एखाद्या सेनापतीसारखा होता. साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात जाऊन त्यांनी सरळ मुख्य सचिव अमरनाथ वर्मा यांना गाठले आणि फार चर्चा न करता आपल्यासोबत आणलेली- अमेरिकन उपग्रहांनी काढलेली पोखरण तयारीची छायाचित्रे वर्मा यांच्यासमोर ठेवली. भारताने अणुचाचण्या केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा दम त्यांनी वर्मा यांना दिला. त्याच दिवशी भारताचा पोखरण चाचण्यांचा निर्णय मागे घेतला गेला. अडीच वर्षांनी म्हणजे 1998 मध्ये भारताने पोखरण चाचणी केली, हा भाग वेगळा. पण, अमेरिकेने भारताची मानगुट पकडण्याची संधी सोडली नव्हती, हेही खरे!