कोरोना लसीच्या दुसर्‍या, तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणीस मंजुरी

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
आरोग्य मंत्रालयाची दिलासादायक माहिती
 
 
नवी दिल्ली : भारतीय औषध महानियंत्रकाने (डीजीसीआय) ऑक्सफोर्ड विद्यापीठाने संशोधित केलेल्या कोरोना विषाणू लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यासाठी मानवी चाचणीस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सोमवारी ही दिलासादायक माहिती दिली.
 
 

Corona_1  H x W 
 
 
कोरोना संदर्भातील विषेतज्ज्ञ समितीने चर्चा केल्यानंतर औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला रविवारी रात्री उशिरा ही मंजुरी दिली, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला सांगितले.
 
 
कंपनीच्या तिसर्‍या टप्प्याच्या नैदानिक चाचण्यांआधी सुरक्षेसंदर्भातील माहिती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे जमा करावी लागणार आहे. याचे मूल्यांकन माहिती सुरक्षा निरीक्षण बोर्ड करणार आहे. या माहितीचे विश्लेषण करून चाचणीचा तिसरा टप्पा हाती घेण्यात येणार आहे.
 
 
या अभ्यासातील प्रारूपानुसार, चार आठवड्यात लसीच्या दोन मात्रा दिल्या जातील. पहिल्याच दिवशी एक मात्रा आणि 29 व्या दिवशी दुसरी मात्रा असे हे प्रमाण राहणार आहे. यानंतर त्या व्यक्तीवर सुरक्षेच्या दृष्टीने दिसणार्‍या परिणामांचा अभ्यास केला जाईल व त्या आधारावर पुढील निर्णय घेतले जातील, असे अधिकार्‍याने स्पष्ट केले.
 
 
ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याचे परीक्षण ब्रिटनमध्ये सुरू आहे. तिसर्‍या टप्प्याचे परीक्षण ब्राझीलमध्ये आणि पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्याचे परीक्षण दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे.
 
 
दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याच्या परीक्षणासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मागणीवर विचार करण्यात आला आहे. एसईसीने जुलैत यासंदर्भात आणखी माहिती मागवली होती तसेच नियमांच्या अधीन राहून संशोधन करण्यास सांगितले होते. एसआयआयने संशोधित प्रस्ताव बुधवारी जमा केला. नैदानिक चाचण्यांसाठी विविध स्थानांची निवड पूर्ण देशातून केली जावी, असा सल्ला देण्यात आला.