राममंदिरासाठी 28 वर्षांपासून अन्नत्याग

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
 
भूमिपूजनानिमित्त व्रताची सांगता करणार ऊर्मिला चतुर्वेदी
 
 
जबलपूर : अयोध्येत श्रीराममंदिर व्हावे यासाठी गेल्या 28 वर्षांपासून अन्नत्याग आंदोलन करणार्‍या जबलपूरच्या ऊर्मिला चतुर्वेदी यांनी 5 ऑगस्टच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपल्या व्रताची सांगता करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
Urmila_1  H x W
 
अयोध्येत लवकरच भव्य श्रीराममंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन सोहळ्यासाठी दाखल होणार आहेत. या सोहोळ्याचे आपल्यालाही निमंत्रण मिळेल अशी 88 वर्षीय ऊर्मिला चतुर्वेदी यांना आशा आहे. गेल्या 28 वर्षांपासून ऊर्मिला राममंदिर निर्माणाची वाट पाहात आहेत.
 
 
 
त्यांनी गेल्या 28 वर्षांपासून अन्नत्याग केला आहे. त्यांनी केवळ दूध आणि फलाहारावर आपल्या आयुष्यातील एवढी वर्षे व्यतीत केली आहेत. परंतु, येत्या 5 ऑगस्ट रोजी राममंदिर निर्माणाच्या भूमिपूजनासोबतच आपले व्रत संपुष्टात आणण्याचा निर्णय ऊर्मिला यांनी घेतल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.
 
 
 
1992 साली कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर रक्तरंजित संघर्ष घडला होता. त्यामुळे ऊर्मिला चतुर्वेदी दु:खी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अन्नत्यागाचा संकल्प घेतला होता.
 
 
आपल्या कुटुंबीयांकडे त्या अयोध्येत नेण्याचा हट्ट करीत आहेत. परंतु, कुटुंबीय कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे आता ही गोष्ट कठीण असल्याचे सांगत आहेत. यापुढे, अयोध्येत राहूनच आपले उर्वरित आयुष्य श्रीरामांच्या सेवेत घालवण्याचा मानस ऊर्मिला चतुर्वेदींनी केला आहे. परंतु, सध्या मात्र त्यांचा उपवास संपुष्टात येणार असल्याने कुटुंबीय आनंदात आहेत. त्यांनी लवकरच अन्नग्रहण सुरू करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ऊर्मिला यांनी आपले व्रत संपविले नव्हते. गेल्या 28 वर्षांत त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. अन्नत्याग केल्याने ऊर्मिला आपले नातेवाईक आणि समाजापासूनही दुरावल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.