कोरोना लढाईत जनतेच्या सहकार्यासह प्रशासन हे सर्वात मोठे शस्त्र

    दिनांक : 20-Aug-2020
Total Views |
जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचे ‘तरूण भारत’भेटीत प्रतिपादन
 bodke12_1  H x
 
जळगाव : कोरोना महामारीला जगाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र या लढाईत जनतेचे सहकार्य आणि प्रशासनाची तयारी हे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले. गुरुवारी ‘तरूण भारत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत सहकार्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
जळगाव जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या तीन गोष्टींचे पालन केल्यास आणि रुग्ण उपचारासाठी तातडीने दाखल झाल्यास मृत्यूचा संभाव्य धोका टाळणे सहज शक्य आहे. त्यासाठी रुग्णांनी त्वरित चाचणी करून उपचार घेण्याची गरज आहे, असे सांगून विविध क्षेत्रातील कोरोना योध्दे रुग्णांना सेवा देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचेही यात मोलाचे योगदान असून सर्व आघाड्यांवर ते अग्रेसर असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन लवकरच कोरोनावर मात करेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
 
माध्यमांकडून अजून प्रबोधनाची गरज
सध्या नागरिकांमध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्ंिसगबाबत बरीच जागृती दिसून येत आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मास्कचा वापरही होत आहे. परंतु अजूनही बाजारात गर्दी करण्याच्या स्वभावावर नियंत्रण आलेले नाही. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे सुरूच आहे. ते आवर्जून टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले. माध्यमांनी विशेषत: वृत्तपत्रांनी आणि इतर प्रसारमाध्यमांनीही कोविडविषयी प्रबोधनावर अजून भर देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी गरजेच्या वस्तू घेण्यासाठी गदीच्या वेळा टाळायला हव्यात, जेणेकरून कोविडचा धोका टाळता येईल. आज नागरिकांना उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडावेच लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेतली व प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पाळले तर आपण स्वत:चा कोरोनापासून बचाव करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांचे सुरूवातीपासूनच प्रशासनाला चांगले सहकार्य आहे. पुढील काळातही प्रबोधनाची ही श्रृंखला माध्यमांनी अविरत सुरू ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
 
अँन्टीजेन टेस्टमुळे रुग्णांवर त्वरित उपचार
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ट्रेस, ट्रीटमेंट, टेस्ट या तीन ‘टी’वर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांच्या अँन्टीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातून रुग्ण शोध मोहीम युध्दपातळीवर राबविली जात आहे. त्यामुळे चाचणीचा अहवाल लागलीच प्राप्त होत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळणेही शक्य होत आहे. प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र त्यासाठी लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेत सजगता
जिल्ह्यात सुरूवातील कोरोना संक्रमण कमी होते. त्यामुळे रुग्ण कमी होते. मात्र त्यानंतर राज्यभरातून झालेल्या स्थलांतरानंतर रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. कारण जळगावला लागूनच मध्यप्रदेशची सीमा असल्याने येथे जाणारे स्थलांतरीत नागरिक जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थांबले होते. त्याचप्रमाणे जिल्ह्याला लागून मालेगाव, औरंगाबाद हे हॉटस्पॉट होते. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा वेग वाढला. जिल्ह्यात अमळनेरला संसर्ग वाढला. त्यानंतर जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढली. जून महिन्यानंतर जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. कोरोना महामारीत आरोग्य यंत्रणेने खूप मोठे काम केले आहे, हे सर्वमान्य आहे. इतर देशातील आरोग्य यंत्रणांच्या तुलनेत भारतात आरोग्य यंत्रणेने विविध बाबींच्या उणिवा असतांनाही इतर देशांच्या तुलनेत खूप मोठी कामगिरी पार पाडली. त्यांंचे कार्य अविरत सुरू आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगात निर्माण झालेल्या कुठल्याही आपत्तीविरुध्द भारत लढू शकतो, हे कोरोनासारख्या महामारीतून प्रकर्षाने जाणवते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
 

bodke_1  H x W:
सामाजिक संस्थाचे योगदान मोठे
कोरोना महामारी विरुध्दच्या लढाईत सामाजिक संस्थांनी खूप मोठे योगदान दिले आहे. सुरूवातीला जिल्ह्यातून जळगाव मार्गे पररराज्यात जाणार्‍या नागरिकांना भोजनाच्या व्यवस्थेसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. त्यानंतर मास्क, सॅनिटायझर वाटपही बहुतांश अशाच संस्थाकडून झाले. तसेच गत महिन्यात पाळण्यात आलेल्या सात दिवसांच्या बंददरम्यान शहरात रूग्ण शोध मोहिमेत सामाजिक संस्थांनी सहभाग दिला. परिणामी, रुग्ण शोध मोहिमेला चालना मिळाली. कोरोना विरुध्दच्या लढ्यात सामाजिक संस्थांचे कार्य जिल्ह्यात अविरत सुरू आहे.
 
कोविड सेंटरबाबत रुग्णांनी भीती बाळगू नये
कोविड सेंटरबाबत रुग्णांनी भीती बाळगू नये. वेळेत रुग्णांची चाचणी करून घेतली आणि उपचार केल्यास रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकतो. यात शंका बाळगण्याचे कारण नाही. नागरिकांनी सोशल मिडीयातील अफवांवर विश्‍वास ठेवू नये. घाबरून जाऊ नये, असे आवाहनही जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले. अफवा पसरविणार्‍यास वेळीच आपण रोखले पाहिजे, जेणेकरून समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. माध्यमांनी या अफवांबाबत वेळोवेळी नागरिकांना जागृत केले पाहिजे. सध्या प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्याने नागरिकांनी खरेदीसाठी ऑनलाईनवर भर दिला आहे. मात्र नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करतांना काळजी घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
 
प्लाझा दान करण्याचे आवाहन
केंद्र शासनाकडून कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी काही रक्कम ही महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून संबंधित खासगी रुग्णालयास मिळते. यासंदर्भात अनेक अफवा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही, असे सांगत त्यांनी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने प्लाझा दान करण्याचेही आवाहन केले.
 
आरोग्य यंत्रणेचे कसोशीने प्रयत्न
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रित करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. शहरासह ग्रामीण भागातही जलद गतीने चाचण्या घेतल्या जात आहेत. तालुका पातळीवर आणि स्थानिक परिसरात त्याला उपचाराच्या सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र परिश्रम घेत आहे. सध्या रुग्णांच्या समस्या निराकरणासाठी स्वतंत्र वॉररूम करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या समस्या, अडचणी त्या माध्यमातून सोडविल्या जात आहेत. गरजेनुसार प्रशासनाकडून सेवा, सुविधेबाबत बदल करण्यात आल्याने रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
 
प्रारंभी माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव संजय नारखेडे यांनी त्यांना ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तक भेट म्हणून देत त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील सुरेश सानप तसेच ‘तरुण भारत’ परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.