पंजाबमधील विषारी दारूची बळीसंख्या 98

    दिनांक : 02-Aug-2020
Total Views |
 
दोन विभागाचे 13 कर्मचारी निलंबित, 25 जणांना अटक
 
 
चंदीगड : पंजाबमध्ये विषारी दारूमुळे तीन जिल्ह्यात आतापर्यंत 98 लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाब सरकारने सात महसूल आणि सहा पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. याशिवाय विशेष तपास पथकाने 25 जणांना अटक केली आहे.
 
 
 
Punjab_Alcohol_Death_1&nb
 
पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेलगतच्या अमृतसर, गुरुदासपूर आणि तरण तारण जिल्ह्यांमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूच्या घटना घडल्या. यातील 46 लोकांचा शनिवारी, तर आज 12 जणांचा मृत्यू झाला. तरण तारण जिल्ह्यात 75 जणांनी आपला जीव गमावला असल्याचे उपायुक्त कुलवंत सिंग यांनी सांगितले. प्रशासकीय स्तरावर डोळेझाक केल्याप्रकरणी सरकारने महसूल विभागाचे सात आणि पोलिस विभागाच्या सहा कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. याप्रकरणी छापामारी करत 25 लोकांना अटक केलेली आहे.
 
 
 
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, असे त्यांनी बजावले आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.
 
 
 
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री तसेच शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी काँग्रेस सरकारवर अवैध दारूविक्रीला संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस आमदार सुखविंदर सिंग डॅनी आणि वन महामंडळाचे अध्यक्ष साध सिंग सिंधू यांच्याविरोधात अवैध दारूविक्रीला संरक्षण दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस आमदारांच्या दबावामुळे अवैध विक्रेत्यांवर कारवाई केली नसल्याने संबंधित अधिकार्‍यांना पदावरून काढून टाकण्याची मागणीही शिरोमणी अकाली दलाने केली आहे.