नरेंद्र मोदी ठरले सर्वात जास्त काळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान

    दिनांक : 02-Aug-2020
Total Views |
सलग 2260 दिवसांपासून पदावर;  अटलजींचा विक्रम मोडला
 
 
नवी दिल्ली : राजकीय क्षेत्रात सातत्याने विविध विक्रम नोंदविणार्‍या पंतप्रधान मोदींनी आज इतिहास घडविला. भारतीय जनता पार्टीचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची नोंद झाली आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. तसेच, सर्वात जास्त काळपर्यंत पंतप्रधानपदावर असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणून देखील पंतप्रधान मोदी यांनी विक्रम केला आहे.
 
 
 
Narendra_Modi_1 &nbs
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे सर्वात प्रदीर्घकाळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. ते सलग 2 हजार 256 दिवस या पदावर होते. 19 मार्च 1998 रोजी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झालेत आणि सलग 22 मे 2004 पर्यंत त्या पदावर राहिले. त्यांचा पहिला कार्यकाळ 19 मार्च 1998 ते 13 ऑक्टोबर 1999 पर्यंत होता, तर दुसरा कार्यकाळ 13 ऑक्टोबर ते 22 मे 2004 पर्यंत होता.
 
 
सद्य:स्थितीत पंतप्रधानपदावर आरूढ असलेले नरेंद्र मोदी हे 2 हजार 260 दिवसांपासून आजतागायत पंतप्रधानपदावर कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ 26 मे 2014 पासून सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे. 2014 मध्ये भाजपा स्पष्ट बहुमत मिळवत देशात सत्तेत आली होती. त्यानंतर 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांचा पहिला कार्यकाळ 2019 मध्ये संपला होता. मात्र, पुन्हा एकदा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा जबरदस्त यश मिळवत सत्ता प्राप्त केली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले.
 
 
स्वातंत्र्यानंतर 1947 पासून ते 2020 पर्यंत देशाला 15 पंतप्रधान मिळाले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम आहे. ते 6 हजार 130 दिवस या पदावर होते.
 
 
जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधी 5 हजार 829 दिवस पंतप्रधानपदावर होत्या. 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 म्हणजेच 11 वर्षे 59 दिवस त्या सलग पंतप्रधान पदावर होत्या. त्यानंतर दुसर्‍यांदा 14 जानेवारी 1980 पासून ते 31 ऑक्टोबर 1984 पर्यंत त्यांनी पंतप्रधानपद सांभाळले.
 
 
इंदिरा गांधी यांच्यानंतर डॉ. मनमोहन सिंग हे सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधानपदावर होते. ते संपुआ-1 व संपुआ-2 सरकारमध्ये 2004 ते 2014 पर्यंत म्हणजेच सलग 10 वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्या नावावर 3 हजार 656 दिवस पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम आहे.