भूमिपूजन म्हणजेच रामराज्याचा प्रारंभ : चौपाल

    दिनांक : 02-Aug-2020
Total Views |
नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर समाजात बंधुता व सलोखा वाढीस लागेल. प्रभू रामचंद्रांनी हीच शिकवण दिलेली आहे. 5 ऑगस्टच्या भूमिपूजन सोहळ्याकडे केवळ मंदिराचे बांधकाम अशा अर्थाने पाहिले जाऊ नये, तर देशात खर्‍या रामराज्याची ही सुरुवात असेल, असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी आज रविवारी येथे केले.
 
 
Kameshwar_Chaupal_1 
 
 
 
अयोध्या चळवळीत अनेक अडचणी आल्यात, अनेकांना बलिदान द्यावे लागले. या बलिदानातूनच आज राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होत आहे. देशात रामराज्य येण्याचे पर्व यातून सुरू होणार आहे. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव हाच प्रभू रामचंद्रांचा सिद्धांत होता. भूमिपूजनानंतर हे सिद्धांत वाढीस लागतील, असे चौपाल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
 
 
राममंदिरासाठी अनेकांनी प्राणाहुती दिली, त्याचप्रमाणे भाजपाने देखील राजकीय बलिदान दिले आहे. उत्तरप्रदेशसह चार राज्यांमधील सरकारचा भाजपाने केवळ राममंदिरासाठी त्याग केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने चार राज्यांमधील भाजपा सरकार बरखास्त करून, तिथे राष्ट्रपती राजवट लादली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
 
अयोध्या आंदोलनात सहभागी होण्यापासून आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला कधीच रोखले नव्हते. ज्या प्रमाणे गंगा नदीचे पाणी आपल्या दारापर्यंत आल्यानंतर काही जण ते पाणी गोळा करतात, तर काहींना त्या पाण्याचे महत्त्वच कळत नाही, तसेच हे आंदोलन आहे. या आंदोलनासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असता, तरी आम्ही स्वागत केले असते, असेही ते म्हणाले.