गुंतवणूक निगडित प्रोत्साहन योजनेत 22 कंपन्या

    दिनांक : 02-Aug-2020
Total Views |
 12 लाख लोकांना मिळणार रोजगार
 
 
 
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील गुंतवणूक निगडित प्रोत्साहन योजनेंतर्गत देशात 22 कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. यात काही विदेशी कंपन्यांचा देखील समावेश असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.
 
 
Samsung_1  H x
 
विशेष म्हणजे, गुंतवणूक निगडित योजनेनुसार भारतीय भ्रमणध्वनी बाजारात 70 टक्के हिस्सा असलेल्या चीनच्या चार कंपन्यांचा यात समावेश करण्यात आला नाही. यात शाओमी, ओप्पो, विवो आणि रिअलमी कंपनीचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 11.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे 3 लाख प्रत्यक्ष, तर 9 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
 
 
 
या कंपन्यांनी उत्पादन सुरू केल्यानंतर 7 लाख कोटी रुपयांची निर्यात केली जाणार आहे. या योजनेनुसार तयार झालेले 60 टक्के फोन निर्यात केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने या योजनेची घोषणा केली होती. यानुसार भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करायचे होते. भ्रमणध्वनी निर्मिती करणार्‍या क्षेत्रात सॅमसंग, फॉक्सकॉन होन हाय, रायिंजग स्टार, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनसारख्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. यातील फॉक्सकॉन होन हाय, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्या ॲपलसाठी उत्पादन करतात. भारतीय कंपन्यांपैकी लाव्हा, डिक्सन टेक्नोलॉजी, मायक्रोमॅक्स, पॅडगेट इलेक्ट्रॉनिक्स, सोजो मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिकचा समावेश आहे.
 
 
 
या योजनेनुसार भ्रमणध्वनी निर्मिती करणार्‍या या कंपन्याचे काम 15 ते 20 टक्क्यांवरून वाढून ते 35 ते 40 टक्क्यांपर्यंत जाईल. गुंतवणूक निगडित प्रोत्साहन योजनेनुसार सरकारतर्फे या कंपन्यांना 41 हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. भारत भ्रमणध्वनी निर्मिती क्षेत्रात सध्या जगात दुसर्‍या क्रमांकावर असून सरकारला पहिले स्थान मिळवायचे आहे.