आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न

17 Aug 2020 21:02:35
‘तरुण भारत’ भेटीत भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी व्यक्त केला मानस
 
dipak pardesi_1 &nbs
 
जळगाव : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना स्वावलंबी बनविण्यासह कोरोना या महामारीच्या काळात सामाजिक हेतू डोळ्यापुढे ठेवून भरारी फाउंडेशन ही बहुउद्देशीय संस्था काम करीत आहे. यामाध्यमातूनच आणि दानशूर व्यक्तींच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. सतत बाधित व्यक्तींशी संपर्कात येत असल्यामुळे कुटुंबीयांना संसर्ग होऊ नये म्हणून गेल्या चार महिन्यांपासून कुटुंबापासून दूर आहे. कारण कुटुंबापेक्षा समाजातील गरजूंचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचे भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.
 
सोमवारी ‘तरूण भारत’ला त्यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीत सहकार्‍यांशी दिलखुलास बातचीत करताना ते बोलत होते. कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्कात असूनसुद्धा योग्य खबरदारी घेतल्यामुळे आतापर्यंत कोरोनापासून दूर आहे. त्यामुळे येथील येणारा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.
 

dipak pardesi1_1 &nb 
 
कॉलेजपासूनच सामाजिक कार्यात
कॉलेजमध्ये असतानाच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे २०१० मध्ये भरारी फाउंडेशनची स्थापना केल्याचे सांगून मित्रासोबत गच्चीवर बोलत असताना पक्षी ज्याप्रमाणे भरारी घेवून उंच उडतो, त्यावरुन ‘भरारी’ हे फाउंडेनसाठी नाव सूचल्याचे ते म्हणाले. त्याकाळातच केशवस्मृती सेवासंस्था समुहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क करुन दिला, असे सांगत दीपक परदेशी म्हणाले की, सातत्यपूर्ण काम आणि नागरिकांसाठी असलेली चंद्रकांतदादांची तळमळ बघून काम करण्यास प्रोत्साहन मिळाले. ते २४ तासांपैकी फक्त ४ ते ५ तास झोपत होते. शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह निर्माणावस्थेत होते. काम अपूर्ण होते. सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करीत होते. पुढे युतीचे सरकार आले आणि दादा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी भरीव निधी उपलब्ध करुन नाट्यगृहास नवी संजीवनी दिली. याच नाट्यसंकुलात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु केले असून तेथे कोरोनाबाधितांवर उपचार झाल्यावर अनेकजण घरी परतले आहेत. याची कोणी कल्पनाही केली नसेल, असेही दीपक परदेशी यांनी आवर्जून सांगितले.
 
आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी घेतले दत्तक
भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांतील सुमारे २७५ मुले-मुली दत्तक घेतले आहे. तसेच अशा कुटुंबातील २२ मुलीही दत्तक घेतल्या असून त्यातील ८ मुलींचा विवाह करुन दिला आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे ठरले.शिक्षणासह त्यांना स्वयंरोजदार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरु असून येत्या वर्षात शाळा आणि रोजगारनिर्मिती करण्याचा मानस असल्याचेही दीपक परदेशी म्हणाले. तसेच आत्महत्या थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
इले.माध्यमांनी वाढविली भीती
इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दिल्या जाणार्‍या वृत्तामुळे अनेकांच्या मनात कोरोनाची अकारण भीती निर्माण झाली आहे. परंतु, दररोज वाढणार्‍या संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्यासुद्धा अधिक आहे. त्यामुळे कोरोना हा जीवघेणा आजार नसून योग्यवेळी उपचार आणि काळजी घेतल्यास कोणतीही व्यक्ती कोरोनावर मात करु शकते. त्यासाठी मनातील भीती दूर करणे महत्त्वाचे असल्याचे परदेशी म्हणाले. तसेच मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या व्यक्तींची योग्य काळजी घेतली पाहिजे. सध्या वातावरण हे अनेक आजारांना अनुकूल ठरणारे असून साधा ताप, सर्दी किंवा खोकला असल्यास कोरोनाची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही दीपक परदेशी यांनी नागरिकांना केले आहे. तसेच सॅनिटायझरचा अतिवापरसुद्धा अनेक त्वचा रोगांना आमंत्रण देणारा असून कुठलाही साबणाने हात धुवावे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
कोविड केअर सेंटरमधून ४२ रुग्ण कोरोनामुक्त
छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात एकूण ६८ कोरोनाबाधित रुग्ण दाखल होते. त्यापैकी ४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून दररोज ५ ते १० नवीन बाधित रुग्ण दाखल होतात. तीन डॉक्टर्स, चार नर्सेस आणि फाउंडेशनचे ६ सहकारी असे २४ तास बाधितांची सेवा करीत असतात. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडूनसुद्धा सल्ला घेण्यात येतो. येथे रुग्णांची हिम्मत वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांद्वारे समुपदेशन केले जाते. तसेच योगासने आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधी दिल्या जातात. या सेंटरला शहरातील दानशूर व्यक्तींचाही हातभार लागतो. खरे तर, बाधित रुग्ण घरी राहूनसुद्धा बरा होऊ शकतो. त्यासाठी फाउंडेशनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला जातो, असेही ते सांगतात.
 
दरम्यान, दीपक परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव संजय नारखेडे आणि सहसचिव विभाकर कुरंभट्टी यांनी पेढा भरवून त्यांचे अभीष्टचिंतन केले. तसेच ‘तरुण भारत’चे विशेषांक आणि सेवाभावे उजळो जीवन हे पुस्तक भेट देत अशाचप्रकारे आपले कार्य सुरु राहावे, अशा शुभेच्छाही दिल्या. यावेळी ‘तरुण भारत’ परिवारातील सर्व सहकारी उपस्थित होते. 
Powered By Sangraha 9.0