शासन, प्रशासन, नागरिकांच्या सहयोगानेच मृत्यूदर कमी होतोय

    दिनांक : 16-Aug-2020
Total Views |
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे ‘तरूण भारत’ भेटीत प्रतिपादन
 
raout_1  H x W:
 
जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये योग्य सांगड घालून मी यंत्रणा कार्यान्वित केली. त्याशिवाय वेगळे काही केले नाही. मात्र नियोजनपूर्वक तपासणींच्या अंमलबजावणीमुळे सध्या या आजाराने मृत्यू पावणार्‍यांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. ती आणखी कमी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा परिश्रम घेत आहे. मात्र नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेतल्यास ती लवकर आटोक्यात आणता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी ‘तरूण भारत’ ला दिलेल्या सदिच्छा भेटीत सहकार्‍यांशी दिलखुलास बातचीत करतांना व्यक्त केला.
 
जिल्ह्यासह शहरातही कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज वाढलेला दिसत असला तरी तो सध्या सुरू असलेल्या सरसकट तपासणीचा परिणाम आहे असे सांगून ते म्हणाले की, पूर्वी केवळ कोरोनाची लक्षणे आढळणार्‍या संशयित रूग्णांचीच तपासणी केली जायची. त्याचे तापमान, स्वॅब आदी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवले जायचे, त्याचा अहवाल येण्यास वेळ लागायचा, तो ‘पॉझिटिव्ह’ आढळला तर त्याच्यावर तसे उपचार प्रारंभ व्हायचे. यामध्ये जाणार्‍या कालावधीमुळे रूग्णाची प्रकृती अधिक गंभीर व्हायची. आता मात्र सरसकट सर्वांचीच तपासणी करण्यात येत असल्याने रूग्ण लगेच दिसून येतो. शिवाय उपचारही लवकर सुरू होतात. त्यामुळे गेल्या काही काळात उपचारानंतर रूग्ण घरी जाण्याची टक्केवारी वाढली आहे तर मृत्यूसंख्या कमी होत आहे. जनतेने अशाचप्रकारे सहकार्य केले तर लवकरच ही संख्या अत्यल्प झालेली दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
प्रारंभी कोरोनाची तीव्रताच कळली नाही
ही महामारी एवढे चिंताजनक रूप धारण करेल असे प्रारंभी कुणालाच वाटत नव्हते. कारण त्याचा प्रादूर्भाव होण्याची गती आणि तो पसरण्याची माध्यमे याबाबत कल्पनाच नव्हती, असे सांगून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, जेव्हा यात बळी पडणार्‍यांची संख्या वेगाने वाढायला लागली त्यामुळे धावपळ उडाली. रूग्णालयात बेडस्, ऑक्सिजन सिलेंडर्स अशा आवश्यक बाबींची त्वरेने पूर्तता करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. यात ताळमेळ बसवताना कधी रूग्णांची हेळसांड झाली तर कधी आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि अन्य घटकांची तारांबळ उडाली. या काळात आरोग्य विभागाने शासन आणि प्रशासनाच्या नियोजनानुसार काम केल्यानेच रूग्णांचा मृत्यूदर कमी होण्यास मोलाची मदत झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
 
मुंबई, नाशिकच्या तुलनेत जळगाव ‘हॉट स्पॉट’
ज्यावेळी महानगरी मुंबई आणि त्या खालोखाल नाशिक येथेही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या स्थिर होती, त्या तुलनेत जळगाव मात्र याबाबत ‘हॉट स्पॉट’ बनले होते. कारण येथे दररोजच रूग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसत होते. केवळ कोरोनाग्रस्त नव्हे तर, त्यात मृत्यू होणार्‍यांचाही आकडा मोठा होता. त्यामुळे नेमकी काय उपाययोजना करावी, याबाबत संदिग्ध स्थिती होती. प्रसारमाध्यमातही जळगावची आकडेवारी पाहताना सर्वांना चिंता वाटायची. तशा स्थितीत मला जळगावला पाठवण्यात आले असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मी येथे आल्यावर वेगळे काहीही केले नाही. केवळ शासन, प्रशासन आणि नागरिकांची योग्य सांगड घालून जनतेला काळजी घेण्याचे महत्व समजावून सांगितले. त्यामुळे जळगावसह जिल्ह्यातील रहिवाशीही अधिक सतर्क झाले. या महामारीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपण स्वत:ला निरोगी ठेवणे जसे आवश्यक आहे, तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सांगितलेली खबरदारी घेणे किती महत्वाचे आहे, हे त्यांना उमगले. आता त्याचे चांगले परिणाम समोर येताना दिसत आहेत असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
 
सामाजिक संस्थांचा सहभाग
कोरोनाच्या नियंत्रणासाठी केशवस्मृती सेवासंस्था समूह, भरारी फाउंडेशन यासह अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनी पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी ‘कोरोना केअर सेंटर’ सुरू केल्याने त्याचीही कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी मोलाची मदत झाली. या सेंटर्समधून मोठ्या प्रमाणावर रूग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्याचा अधिक आनंद आहे असे सांगून प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेऊन वेळीच उपचार घेतले तर कोरोनावर सहज मात करणे शक्य आहे, असा ठाम विश्वासही जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला. प्रारंभी निवासी संपादक दिनेश दगडकर यांनी ‘तरूण भारत’ बद्दल माहिती दिली. त्यानंतर माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा आणि सचिव संजय नाररखेडे यांनी पुष्पगुच्छ तसेच ‘तरूण भारत’ चे दिवाळी विशेषांक, सेवाभावी संस्थांचा कार्यात्मक आढावा असलेले ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तक आणि विशेष वृत्त असलेले अंक देवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे स्वागत केले. यावेळी ‘तरूण भारत’ परिवारातील विविध विभागातील सहकारी उपस्थित होते.
 
 
 
raoutd_1  H x W
लक्षणे जाणवताच त्वरित उपचार घ्या
कोविड संदर्भात लक्षणे जाणवल्यास रुग्णांनी त्यावर पहिल्या तीन ते पाच दिवसाच्या आत उपचार केल्यास त्यांना गावपातळीवर उपचार मिळून रुग्ण तातडीने बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी कोरोना चाचणीसह त्वरित उपचारासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हावासियांना केले. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून युध्दपातळीवर उपाययोजना आणि रुग्णांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी वॉर रुमची निर्मिती केली आहे. त्यामाध्यमातून रुग्णांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
अफवांना बळी पडू नका
केंद्र सरकारकडून कोरोनाच्या प्रत्येक रुग्णामागे खर्च म्हणून पैसे मिळतात अशी अफवा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाच्या या महामारीने संपूर्ण जग भयभीत असताना काही लोक अशा संवेदनशील काळात सोशल मिडियावर अशा अफवा पसरवून भीती निर्माण करीत आहे. त्यामुळे कुणीही याकडे लक्ष देवू नये. तसेच असा संदेश टाकणार्‍यांवरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिला. जिल्हा कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित मृतदेह हाताळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांवर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे, असे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटलमधून मृतदेह अंत्यसंकारासाठी नेताना नातेवाईकांची मदत घेतली जाते. अशावेळी त्यांच्याकडे कुठलीही पीपीई कीट तसेच तोंडाला मास्क नसल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
 
व्यापारी, दुकानदारांची तपासणी
शहरातील वाढत्या कोविडच्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना सुरु आहेत. आगामी काळात शहरातील व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अजून काही उपाययोजनांवर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्पष्ट केले. शहरातील व्यापारी संकुलातील गाळेधारकांना पूर्ण आठवडाभर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी या मागणीवर बोलतांना ते म्हणाले की, सध्या शहरातील कोविडची स्थिती लक्षात घेता त्यात बदल करणे तूर्तास शक्य नाही.
 
जिल्हाधिकारी शासनाचे डोळे व जीभ
जिल्हाधिकारी हा शासनाचा नेत्र आणि जीभ असतो, असे रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी म्हटले आहे, असे विचारता जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, काम करताना डोळे उघडे ठेवून काम करावे लागते. तसेच उत्तर देताना जिभेचेही भान ठेवावे लागते. जि.प.चे सीईओ हे शिक्षकासारखे तर जिल्हाधिकारी हे पी.टी.शिक्षकासारखे असतात, असेही एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले.