नियम पाळणार्‍या दुकानदारांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत तर उल्लंघन करणार्‍यांवर ‘सीलबंद’ची कारवाई

14 Aug 2020 16:30:04

upayukt_1  H x
 
जळगाव :  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शहरामधील सर्व व्यापारी संकुलातील दुकाने आठवड्यात चार दिवस सुरु करण्यात आली आहेत. परंतु, दिलेल्या वेळेनंतरही गोलाणी मार्केटमधील अनेक दुकाने सुुरु असल्याचे निदर्शनास आल्याने शुक्रवारी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी ती दुकाने सील केलीत. तर वेळेत दुकान बंद करणार्‍या व्यापार्‍यांचे त्यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
 
शहरातील सर्व व्यापारी संकुलातील दुकाने ५ ऑगस्टपासून मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी बंद ठेवून इतर दिवशी उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार फुले मार्केट, सेंट्रल फुले, गांधी मार्केट, दाणा बाजार आणि गोलाणी मार्केटमध्ये दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या १० तासाच्या कालावधीत दुकाने उघडण्यात येत आहेत. तसेच अन्य मार्केटमधील वेळेत बंद होतात. परंतु, गोलाणी मार्केटमधील दुकाने सायंकाळी ७ नंतरही सुरु असल्याच्या अनेक तक्रारी उपायुक्तांकडे आल्या. त्याची दखल घेत उपायुक्त संतोष वाहुळे हे स्वतः ७ वाजेनंतर गोलाणी मार्केटमध्ये येवून अशा दुकानांचे चित्रण करुन शुक्रवारी दुपारी संबंधित दुकानांवर सील बंदची कारवाई केली. यावेळी कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचेसुद्धा सहकार्य घेण्यात आले.
 
अन्यथा १५ ऑगस्टनंतर पुन्हा होणार लॉकडाऊन
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तो टाळण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे दुकानांचा वेळ ठरविण्यात आला आहे. परंतु, दिलेल्या वेळेत दुकाने सुरुच असल्याचे प्रकार घडत आहे. तसेच मार्केट बंदच्या दिवशीसुद्धा गोलाणी मार्केटमध्ये अनेक व्यापारी दुकाने सुुरु असतात. त्यावर वेळोवेळी सूचना देवूनसुद्धा दुकानदार ऐकत नसल्याने मनपा प्रशासनाकडून सील बंदची कारवाई केली जात आहे. दरम्यान, हे प्रकार असेच सुरु राहिल्यास आणि दुकानदारांनी प्रशासनास सहकार्य न केल्यास १५ ऑगस्टनंतर पुन्हा सर्व मार्केटमधील दुकाने बंद करण्यात येतील, असा इशाराही उपायुक्त संतोष वाहुळे यांनी व्यापार्‍यांना दिला.
Powered By Sangraha 9.0