वाघूर धरणात जळगाव शहराला ३ वर्ष पुरेल इतका पाणीसाठा!

    दिनांक : 14-Aug-2020
Total Views |
महापौरांनी केली पाहणी : पाणी शुद्धीकरणाबाबत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
 

mayor_1  H x W: 

जळगाव : गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वाघूर धरणात मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. जळगाव शहराला तीन वर्ष पुरेल इतका पाणीसाठा आज धरणात असून वरुणदेवाची कृपा राहिल्यास लवकरच धरण १०० टक्के भरेल असा विश्वास महापौर भारती सोनवणे यांनी व्यक्त केला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर भारती सोनवणे यांनी वाघूर धरण, वाघूर पाणी पुरवठा योजना पंप हाऊस, उमाळे जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, भाजप गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, शहर अभियंता डी.एस.खडके, पाणी पुरवठा अभियंता सुशीलकुमार साळुंखे आदी उपस्थित होते.
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाची उच्चतम पाणी साठवण क्षमता २३४.११० दलघमी असून धरणात सध्या २३३.१५० दलघमी पाणी साठा आहे. गेल्या पाच दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने खबरदारी म्हणून धरणाचे २ दरवाजे २० सेमीने तर २ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले आहे.
महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
पावसाळ्याचे दिवस असल्याने धरणात विविध पाणलोट क्षेत्रातून पाणी येत असते. धरणाचे पाणी दूषित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. वाघूर धरणाचे पंप हाऊस आणि उमाळे जलशुद्धीकरण प्रकल्पाला देखील महापौर व उपमहापौर यांनी भेट दिली. धरणात पाणी वाढले असल्याने गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांना शुद्ध आणि गढूळपणा नसलेले पाणी देण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी केल्या. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह सर्वांनी पाण्याची चव देखील तपासली.
साथरोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी : महापौर
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. उमाळे जलशुद्धीकरण केंद्रावर पाहणी करून सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात धरणात गावागावातील सांडपाणी देखील मिसळत असते. काही वेळेस पाणी गढूळ येते. पावसाळ्याच्या दृष्टीने कावीळ, अतिसार, गॅस्ट्रो सारखे साथरोग उद्भवू नये यासाठी नागरिकांनी पाणी उकळूनच प्यावे तसेच बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.