कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेवून प्रत्येकाने स्वयंशिस्त लावण्याची गरज

13 Aug 2020 22:51:22
‘तरुण भारत’त भेटीत मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी व्यक्त केली अपेक्षा

 
santosh_1  H x
 
जळगाव, १३ ऑगस्ट
जळगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला असून त्याचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त लावणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मनपाचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी व्यक्त केली. ‘तरुण भारत’ कार्यालयास गुरुवारी सदिच्छा भेट दिल्यानंतर सहकार्‍यांशी मनमोकळी बातचीत करताना ते बोलत होते.
 
कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण जेव्हा जळगावमध्ये आढळला, त्यावेळी नागरिकांनी शासनाच्या नियमांनुसार वागून शिस्त लावली होती. परंतु, जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला, तसातसा नागरिकांचा फाजील आत्मविश्‍वाससुद्धा गरजेपेक्षा अधिक वाढला आहे. त्यामुळे आता कोरोनाची मनात भीती न ठेवता नागरिक या महामारीकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत, हे कारणसुद्धा शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढीसाठी कारणीभूत असल्याचे उपायुक्त वाहुळे म्हणाले. अशा स्थितीत नागरिकांनी शासनाच्या नियमांनुसार वागणे आवश्यक आहे. जसे - घराच्या बाहेर पडताना तोंडाला मास्क किंवा रुमाल लावणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदी प्राथमिक बाबींचा प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास कोरोनापासून आपण सुरक्षित राहू शकतो. तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा कोरोनापासून दूर ठेऊ शकतो, असेही ते म्हणाले.
 

santoshdfs_1  H 
 
गर्दी टाळा
फुले मार्केट, दाणा बाजार, सुभाष चौक आणि पुष्पलता बेंडाळे चौक आदी ठिकाणी ग्राहकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी दररोज गर्दी होत असते. त्यामुळे ग्राहकांनी आपला चोखंदळपणा सोडून खरेदीसाठी दुसरे पर्याय शोधणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या प्रतिसादामुळेच दुकानदार कोरोनाच्या या महामारीतसुद्धा दुकान बाहेरुन बंद ठेवून आत व्यवसाय करीत असल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली आहे, असे सांगत ते म्हणाले की, नागरिकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. केवळ स्वतःचा नव्हे तर समाजाचा विचार केला पाहिजे.
 
अनेकांवर कारवाई
नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानांवर मनपा प्रशासन दंडात्मक कारवाईसुद्धा करीत आहे. ही कारवाई कोरोना संसर्ग टाळण्यासाठी होत आहे, असे सांगून वाहुळे म्हणाले की, लोकांची गर्दी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करुन मुख्य बाजारपेठेत पत्रे लावण्यात आली होती. मात्र नागरिकांनी बेजबाबदारपणे ती काढून दुकाने गाठली. गरजेपेक्षा अधिक खरेदी करण्याचे प्रकारही घडल्याचे ते म्हणाले. आपण नियंत्रण ठेवले तर दुकानदार दुकान उघडू शकणार नाही, असे सांगून आता तरी अतिआत्मविश्‍वास टाळावा, असेही ते म्हणाले.
 
प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. सुरुवातीला जळगावमध्ये कोरोनाच्या निदानासाठी वेळ लागत होता. आता तपासणीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्याने तो वेळ कमी झाला असून दिवसाला दोन हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी होत आहे. कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आल्यानेसुद्धा प्रारंभी कोरोनाचा विळखा वाढल्याचे त्यांनी सांगितले. नंतर मात्र रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी त्यावर उपाययोजना सुरु केल्याने लवकरच स्थिती आटोक्यात येईल वाटते, त्यासाठी नागरिकांचाही सहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आपल्याला काही होणारच नाही अशा भ्रमात कुणीही राहू नये. कारण सप्टेंबरपर्यंत रुग्णसंख्या अधिक वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. यासोबतच जळगावचे नागरिक भलतेच सहनशील आहेत, असेही ते म्हणाले.
 
सुवर्णमध्य साधणे आवश्यक 
प्रशासकीय सेवेत काम करताना आपल्या चौकटीत राहून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे नागरिक आणि प्रशासनाची योग्य सांगड घालून सुवर्णमध्य साधत जनसेवा कशी करता येईल, याकडे अधिक प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे, असे सांगत उपायुक्त वाहुळे यांनी प्रशासनातील आपले पूर्वीचे अनुभवही सांगितले. याकाळात कारवाईवेळी अतिक्रमण पथकावर अनेकदा हल्ले झाले. परंतु, पथकातील कर्मचार्‍यांचे मनोबल खचू नये यासाठी सर्वांच्या पुढे थांबून सामंजस्याने समस्या सोडविल्या. त्यामुळे अनेक भागातील अतिक्रमणाचा प्रश्‍न सोडविण्यात यश आल्याचा आनंद आहे. प्रश्‍न सोडवितांना केवळ कायद्याचा नव्हे तर हृदयाचाही वापर करावा, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
 
हे खरे कोरोना योध्ये
कोरोनाच्या या संकटकाळात कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतात. त्यामुळे मृतदेह रुग्णालयात पडून राहतो. अशावेळी मनपातील अनेक कर्मचारी त्या मृताचे अंत्यसंस्कार करतात, मात्र ते कधीच समोर येत नाहीत. हेच खरे तर कोरोना योध्या असल्याचा उल्लेख करुन त्यांनी या काळात मनपातील आरोग्य खात्यातील सर्वजण जीवाची पर्वा न करता कशी मेहनत घेत आहे, हे सांगितले. त्या खर्‍या कोरोना योध्यांना माझा सलाम आहे, असेही उपायुक्त  म्हणाले.
 
कुटुंबात पोलिसी सेवेची परंपरा मोडली
उपायुक्त संतोष वाहुळे हे लातूर येथील मूळ रहिवासी असून त्यांनी एम.एस्सी.(ऍग्रि.) केले आहे. त्यांच्या कुटुंबात प्रशासकीय सेवेचा मोठा वारसा आहे. कुटुंबातील तब्बल १३ सदस्य पोलीस खात्यात विविध जबाबदारी सांभाळत आहेत. त्याच परंपरेत प्रारंभी त्यांनीसुद्धा पोलीस उपनिरीक्षक म्हणून काही वषर्र्े सेवा केली. मात्र लोकाभिमुख सेवा करण्याची संधी मिळतेय म्हणून पुढे परीक्षा देवून ते सध्या उपायुक्तपदी कार्यरत आहेत. घरी असतो तेव्हा संपूर्णपणे घरचा आणि कार्यालयात आल्यावर केवळ कार्यालयाचा विचार करतो. त्यामुळे गुणवत्तापूर्ण काम करु शकतो, असे आपल्या यशाचे रहस्य सांगताना वर्णविद्वेशाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणारे नेल्सन मंडेला हे माझे सार्वकालिक आयडॉल असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
पुन्हा मोठ्या कारवाईचे दिले संकेत
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता तसेच शहरातील होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लवकरच पुन्हा मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतसुद्धा उपायुक्तांनी यावेळी दिले. मनपातील अतिक्रमण विभागातील मक्तेदारी मोडून काढून संस्थानिक बनू पाहणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
प्रत्येक हॉकर्सची होणार तपासणी
जळगावमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपा प्रशासनातर्फे लवकरच प्रत्येक हॉकर्सची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवाजीनगरातील मनपाच्या शाळा क्रमांक १ मध्ये दररोज ४०० ते ५०० जणांची तपासणी होईल. तसेच शहरात हॉकर्सचा विषयही गंभीर असून तो सोडविण्यासाठी हॉकर्सनीच पर्याय सूचवावा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्याचेही उपायुक्त संतोष वाहुळे म्हणाले.
 
१५ लाख दंड वसूल
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानांवर मनपा प्रशासनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात २८५ दुकाने सील करण्यात येवून १५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. याचकाळात ६५ जणांवर गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.
 
प्रारंभी त्यांना ‘सेवाभावे उजळो जीवन’हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यालयातील सर्व सहकारी उपस्थित होते. 
Powered By Sangraha 9.0