आमदार डॉक्टरांनी केली गर्भवतीची प्रसूती

    दिनांक : 12-Aug-2020
Total Views |
रुग्णालयात कर्मचारी नसल्याने पेलली जबाबदारी
 
 
ऐझवाल : आमदार डॉ. झेड. आर. थियमसंग यांनी मिझोरममधील दुर्गम चंपाई जिल्ह्यात वेळेवर वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध न झाल्याने महिलेची प्रसूती केली. त्यामुळे या महिलेला जीवदान मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी आमदार हे वैद्यकीय सेवा देत होते.
 
 
 
Beby_1  H x W:
 
 
आमदार थियमसंग हे स्त्रीरोगतज्ज्ञ असून, ते अनेकदा दुर्गम भागात भेटीला जाताना स्वत:जवळ स्टेथोस्कोपसह अन्य काही वैद्यकीय उपकरणे बाळगतात. या भागात नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे झालेले नुकसान आणि कोरोनासंबंधी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी म्यानमार सीमेजवळील मतदारसंघ उत्तर चांफाई येथे गेले होते. यावेळी त्यांना नग्गूर गावातील गर्भवती सी. लालमंगैहसंगी हिची प्रकृती गंभीर असून, वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याची माहिती मिळाली. तसेच, सुमारे 200 किलोमीटर अंतरावरील ऐझवाल येथील रुग्णालयात जाण्याची संबंधित महिलेची स्थिती नव्हती. परिस्थितीचे गांभीर्य पाहून आमदार महोदयांनी महिलेची स्वत: प्रसूती केली. याबाबत त्यांनी सांगितले की, गर्भवती महिलेच्या प्रकृतीची माहिती कळताच मी ताबडतोब रुग्णालयात दाखल झालो आणि शस्त्रक्रिया केली. बाळ व बाळंतिणीची प्रकृती चांगली आहे.
 
 
 
 
आमदार थियमसंग हे यापूर्वीही जून महिन्यात भारत-म्यानमार सीमेवर तैनात असलेल्या आजारी जवानाची मदत केल्यामुळे चर्चेत आले होते. एक मोठा नाला पार करीत अनेक किलोमीटर चालत ते जवानाजवळ पोहचले होते. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून जबाबदारी पार पाडत. राजकारणात आल्यानंतरही त्यांनी आपले पूर्वीचे कर्तव्य सोडलेले नाही. दरम्यान, डॉ. थियमसंग हे मिझो नॅशनल फ्रंटचे आमदार आहेत. 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे टी. टी. झोथनसंग यांना पराभूत केले होते.