चिनी कंपन्यांचा हजार कोटींचा हवाला व्यवहार उघडकीस

12 Aug 2020 20:34:22
 
-बेकायदेशीर सावकारीत भारतीयांचाही समावेश
 
 
- आयकर विभागाची कारवाई
 
 
नवी दिल्ली : आयकर विभागाने विविध भागांमध्ये छापे मारून, चिनी संस्थांसोबत काही भारतीयांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे बेकायदेशीर सावकारी आणि हवाल्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे, असा दावा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मंगळवारी रात्री उशिरा केला आहे.
 
 
 
chinese-companies_1 
 
बनावट कंपन्या उघडून काही चिनी आणि त्यांचे भारतातील साथीदार बेकायदेशीर सावकारी आणि हवाला व्यवहार करीत असल्याची गोपनीय माहिती आयकर विभागाला प्राप्त झाली होती. त्यानंतर या चिनी संस्थांची ठिकाणे, त्यांचे निकटवर्तीय आणि बँक कर्मचार्‍यावर छापेमारी करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे.
 
 
 
या चिन्यांनी बनावट संस्था स्थापन करून उघडलेल्या 40 पेक्षा जास्त खात्यांमध्ये मागील काही काळापासून एक हजार कोटी रुपये जमा झाल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. किरकोळ विक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी चिनी कंपनीच्या उपकंपनीने व त्यासंबंधीत संस्थांनी स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांकडून 100 कोटी रुपयांची बनावट अग्रीम रक्कम स्वीकारली, असेही या निवेदनात म्हटले आहे.
 
 
या बेकायदेशीर सावकारी आणि हवाला व्यवहारांसाठी काही बँकांच्या कर्मचार्‍यांनी आणि सनदी लेखापालांनी देखील मदत केल्याचे छापेमारीत निष्पन्न झाले आहे. हवाला व्यवहारासाठी हॉंगकॉंग आणि अमेरिकी डॉलर्सचा वापर करण्यात आल्याचे देखील उघडकीस आले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोदली जात आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
 
 
कोरोना महामारीचा फायदा घेत देशातील कंपन्यांचे समभाग विकत घेण्याचा प्रयत्न चीनमधील सरकारी कंपन्यांनी केल्यानंतर केंद्र सरकारने चिनी गुंतवणुकीवर अंकुश ठेवला. या नंतर ही धक्कादायक घडामोड समोर आली आहे.
Powered By Sangraha 9.0