‘पारदर्शी करप्रणाली, प्रामाणिक करदाता’ कार्यक्रमाचा गुरुवारी शुभारंभ

    दिनांक : 12-Aug-2020
Total Views |
नवी दिल्ली : पारदर्शी करप्रणाली आणि प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवारी एका विशेष कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहे. यामुळे प्रत्यक्ष कर सुधारणा कार्यक्रमाला गती मिळणार आहे.
 
 
 
 
Narendra-Modi-Nirmala-Sit
 
आभासी माध्यमातून होणार्‍या या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने गेल्या वर्षात प्रत्यक्ष कराच्या रचनेत आणि स्वरूपात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. प्रमंडळ कर 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर आणण्यात आला आहे, नव्याने स्थापन झालेल्या कंपन्यांसाठी, तर हा 15 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. लाभांश वितरण करही रद्द करण्यात आला आहे.
 
 
 
 
कर सुधार कार्यक्रमांतर्गत कराचे दर कमी करण्यात आले असून, प्रत्यक्ष कर कायदा अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. आयकर विभागाच्या कामकाजात अधिक सतर्कता आणि पारदर्शीपणा आणण्यासाठी प्रत्यक्ष कर मंडळाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रामाणिक करदात्याला कोणताही त्रास होणार नाही, उलट त्याला प्रोत्साहन मिळेल, असे वातावरण तयार करण्यात आले आहे. आयकर विवरण दाखल करण्याची प्रक्रियाही सुलभ आणि सोपी करण्यात आली आहे.
 
 
 
अर्थव्यवस्थेलाही उभारी देणार
कोरोनाच्या संकटामुळे पिछेहाट झालेल्या अर्थव्यवस्थेला नव्याने उभारणी देण्यावरही यात पंतप्रधान भर देणार आहेत. ‘पारदर्शक कररचना’ असे या नव्या टप्प्याचे नाव राहणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज जारी केलेल्या निवेदनातून ही माहिती देण्यात आली आहे.
 
 
 
विविध करांच्या दरात कपात करून, संपूर्ण करविषयक प्रक्रिया पारदर्शक करणे हा या टप्प्यातील मुख्य उद्देश आहे. आयकर खात्याच्या कामकाजात पारदर्शकता आणि स्पष्टता आणण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याआधीच काही महत्त्वाची पावले उचलली आहेत.