पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'ओएफसी'चे लोकार्पण

    दिनांक : 10-Aug-2020
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २३०० किलोमीटर लांब 'अंडर सी केबल लिंक'चे उद्घाटन केले. या केबल्सद्वारे ४०० जीबीपीएस इंटरनेट स्पीड मिळू शकणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
 
PM_OFC_1  H x W
 
 
आजचा दिवस अंदमान-निकोबारच्या बेटांवर वसलेल्या लाखो लोकांसह संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी मला सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) कनेक्टिव्हिटी योजनेचा शुभारंभ करण्याची संधी मिळाली होती. आज हे काम पूर्ण झाले असून मला आनंद आहे की, याच्या लोकार्पणाचे सौभाग्य मला मिळाले, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले.
 
 
 
समुद्रात खोलवर २३०० किमीपर्यंत केबल पसरवणे सोपे काम नाही. खोल समुद्रात सर्व्हे करणे, केबल क्वालिटी नियंत्रण करणे, विशेष जहाजांद्वारे केबल पसरवणे हे खरंच प्रशंसनीय काम आहे. जितका मोठा हा प्रोजेक्ट होता तितकीच आव्हानेही यात समावलेली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून या सुविधांची गरज असूनही यावर काम सुरू झाले नव्हते. परंतु, सगळे अडथळे बाजुला सारून हे काम पूर्ण झाले याचा मला आनंद आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.
 
 
 
अंदमान निकोबारला संपूर्ण देशाशी आणि जगाशी जोडणारा हा ऑप्टिकल फायबर प्रोजेक्ट 'ईज ऑफ लिव्हिंग'प्रती आपल्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे. यामुळे, ऑनलाईन शिक्षण, पर्यटन व्यवसायातून कमाई, बँकिंग, शॉपिंग, टेली मेडिसिन अशा अनेक गोष्टी अंदमान निकोबारच्या हजारो कुटुंबीयांना ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतील, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.