चीन, इटली, इराणमधून जगात पसरला कोरोना

01 Aug 2020 16:57:15

बिजिंग : चीनच्या वुहानमधूनच जगभर कोरोनाचा संसर्ग पसरल्याचा आरोप होत असताना एका संशोधनात वेगळाच दावा करण्यात आला आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणू पसरण्यासाठी चीनसह इटली व इराण या देशातील प्रवासी जबाबदार असल्याचा दावा ‘दी लान्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात करण्यात आला आहे.

Corona_1  H x W 
 
 
जगभरात सुरुवातीचे कोरोनाबाधित चीन, इटली आणि इराण या देशातील होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्पातील दोन तृतीयांश प्रकरणांसाठी चीन, इटली व इराणमध्ये प्रवास करणार्‍यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. चीन, इराण व इटली या देशाच्या प्रवासाशी संबंधित लोक 31 डिसेंबर 2019 ते 10 मार्च 2020 दरम्यान महासाथीचा आजार घोषित करण्यापूर्वी चीनबाहेर कोरोनाचे दोन-तृतीयांश रुग्णसंख्येसाठी जबाबदार आहेत, असे या संशोधन अहवालात म्हटले आहे.
 
 
 
याच कालावधीत चीनबाहेर सुमारे 75 टक्केदेशांनी कोरोना महासाथीच्या आजाराच्या घोषणेपूर्वी 11 आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती दिली होती. संशोधनानुसार, कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील जे रुग्ण आढळले, त्यातील 27 टक्के इटली प्रवासातून, 22 टक्के चीन व 11 टक्के प्रवासी इराणच्या प्रवासाशी संबंधित होते.
 
 
कोरोना महासाथीचा आजार घोषित होण्यापूर्वी काही देशांमधून प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू जगभरात फैलावला, असे महासाथ आजार तज्ज्ञ डॉ. फातिमा दाऊद यांनी सांगितले. कोरोनाला 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने महासाथीचा आजार म्हणून घोषित केले होते.
 
 
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात आढळला होता. चीनशिवाय इटली व इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळले होते. चीनमध्ये कोरोना विषाणूची निर्मिती झाली का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना करत आहे.
 
 
‘दी लासेन्ट’च्या संशोधन अहवालात 10 मार्चपर्यंतची सार्वजनिक माहिती, सूचना व सांख्यिकीचा आधार घेण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0