धडगाव येथे टवाळखोर तरूणांकडून घरावर दगडफेक

09 Jul 2020 21:43:21
 
 
पोलिसांकडून कारवाईची मागणी, मध्यरात्री २५ जणांचे कृत्य
तभा वृत्तसेवा
धडगाव, ९ जुलै
शहरातील टवाळखोर तरुणांनी किरकोळ कारणावरून राग येऊन एकाच्या घरावर तूफान दगडफेक करुन घराचे दरवाजे व स्कूटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांच्या कारवाईकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.
 
 
शहरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोर्‍यांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी रात्री जुन्या तहसील समोरील वसाहतीतील रहिवासी अजय भावसार यांच्या घरासमोरील बल्ब चोरणार्‍या एकास हटकवले असता त्याचा राग येवून संशयित चोराने मित्रांच्या मदतीने घरावर जोरदार दगडफेक केली. रात्री एक ते दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेने भावसार कुटुंबीय घाबरले होते. याविषयी घटनेची खबर पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.
रात्री पोलिसांनी संशयित आरोपीस पकडून समज देवून सोडून दिले असता, संशयिताने पुन्हा २५ ते ३० मित्रांच्या सहाय्याने भावसार यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या दरवाजास भगदाड पडले असून स्कुटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी गावातील नागरिकांच्या वतीने करण्यत येत आहे.
शहरातील बेवारस शासकीय इमारती सध्या दारुड्यांचा अड्डा बनला आहे. याठिकाणी सायंकाळ पासून काही टारगट तरुण एकत्र जमून गुटखा, सिगारेट व दारूचे सेवन करून टिंगलटवाळी करत असतात. यामुळे परिसरातील वस्तीतील रहिवाश्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश असतांना या युवकांच्या टोळक्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0