मनपा अन् केशवस्मृती सेवासंस्था समूहातर्फे नागरिकांचे सर्वेक्षण, स्क्रिनिंग प्रारंभ

09 Jul 2020 21:59:53

ksp_1  H x W: 0 
 
जळगाव, ९ जुलै
जळगाव शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि बहुआयामी सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून आपली विशेष ओळख निर्माण करणार्‍या केशवस्मृती सेवासंस्था समूहातील विविध प्रकल्पातील सहकार्‍यांच्या सहयोगाने जळगावातील विविध भागात गुरुवारी ९ गु्रपने २८४ कुटुंबातील ११०५ सदस्यांची माहिती घेतली. त्यात घरोघरी प्रत्येकाची माहिती घेत त्यांचे तापमान, पल्स मोजणे तसेच आर्सेनिक अल्बम -३० होमिओपॅथिक औषधाचे वितरणही केले.
 
 
कोरोनविरुद्ध लढण्यासाठी एकीकडे शासन आणि प्रशासन सतत नागरिकांना जागृत करीत असले तरी दुसरीकडे बेजबाबदार वृत्ती आणि’ आपल्याला काही होत नाही ’ अशा अतिआत्मविश्वासामुळे अनेकांना या विषाणूची लागण झाली. परिणामी, रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी दररोज वाढत गेली. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही हतबल झाली आहे.त्यात पोलीस आणि डॉक्टर्स यांच्यावर अधिक ताण पडतो आहे.
 
 
हे सर्व लक्षात आल्यावर जळगाव महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागातील नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचा आणि त्यांची माहिती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे सर्वेक्षण सुरू झाले आहे.
 
 
खरेतर, सर्वेक्षणाचे हे काम अत्यंत क्लिष्ट आणि वेळ घेणारे आहे. लोकांकडून खरी माहिती काढून घेणे, त्यांना बोलते करणे सोपे नसते.मात्र सेवाभाव आणि संयम यांच्याच पायावर उभारणी झालेल्या केशवस्मृती सेवासंस्था समूहाने यात सहकार्यासाठी हात पुढे केला आणि या समूहातील विवेकानंद प्रतिष्ठान, गोळवलकर रक्तपेढी, जळगाव जनता सह.बँक, तरुण भारत, श्रवण विकास, जेजेआयटी, चाईल्ड लाईन, बळवंत पतसंस्था या प्रकल्पातील ६० सहकारी प्रत्यक्ष मैदानात उतरले.त्यांनी गुरुवारी प्रतापनगर, ढाके कॉलनी, जेडीसीसी बँक परिसर, डॉ.सहस्रबुद्धे यांच्या दवाखान्यामागील भागात घरोघरी जाऊन नागरिकांची संपूर्ण माहिती घेतली. तसेच त्यांच्या शरीराचे तापमान, पल्स मोजणी करीत त्यांच्या आजाराबद्दलही माहिती घेतली. त्यासोबतच त्यांना प्रतिबंधात्मक औषध म्हणून आर्सेनिक अल्बम - ३० या होमिओपॅथिक औषधीचेही वितरण करण्यात आले.
 
 
यात अभाविपनेही सहभाग घेतला होता. या उपक्रमातून केशवस्मृती सेवासंस्था समूहाची सामाजिक भानाची भूमिका अधिक ठसठशीतपणे सर्वांपुढे आली आहे
Powered By Sangraha 9.0