सत्ताधारी घरात दडून बसल्याने आम्ही निघालोय जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी

09 Jul 2020 21:51:04
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद

fda_1  H x W: 0 

जळगाव, ९ जुलै
कोरोनासारख्या कठीण काळात लोकांना मदत करणे सोडून राज्यातील सत्ताधारी घरात बसले आहेत. सत्ताधार्‍यांना सर्वसामान्य लोकांची चिंता नसेल पण आम्हाला आहे. त्यांनी कितीही टीका केली तरी लोकांना हे बरं वाटतंय की कुणीतरी येऊन आमचं दुःख पाहतंय. आम्ही राजकारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीसाठी करत नाही तर जनतेसाठी करतो. जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणारच आणि त्यांना दिलासा देणार, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणार्‍या टीकेला गुरुवारी जळगावात जोरदार प्रत्युत्तर दिले.
 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करत आहेत. या दौर्‍यात गुरुवारी जळगावात असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी सत्ताधारी, राज्यासह जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, कोरोनासाठीच्या उपाययोजना अशा विषयांवर मते मांडली. त्यांनी सुरुवातीला विशेष कोविड रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबतचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी कोरोनाचा वाढता संसर्ग, बाधितांचा वाढता मृत्यूदर आणि संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती घेतली.
 
 
जळगावात ठोस उपाययोजनांची गरज...
जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर काळजी करण्यासारखा आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे. सध्या प्रमाणापेक्षा कमी टेस्टिंग होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. टेस्टिंगचे अहवाल चार-चार दिवस येत नसल्याने संसर्ग वाढून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे २४ तासात अहवाल येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका देखील कमी असल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका वाढविण्याची मागणीही आम्ही केली. रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था उशिरा होते. वाहनांना वेळेवर डिझेल मिळत नाही, अशा तक्रारी जळगावात असल्याचेही ते म्हणाले.
 
 
नॉन कोविड रुग्णांची समस्या मोठी...
जिल्ह्यात कोविड रुग्णांपेक्षा नॉन कोविड रुग्णांची समस्या मोठी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शासकीय रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्याने नॉन कोविड रुग्ण जळगाव शहरापासून दूर असलेल्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविले जातात. तेथे त्यांचे हाल होतात, तेथे मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0