महाळपूर येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचारप्रकरणी नराधमास फाशीची शिक्षा द्या

08 Jul 2020 21:51:02
 
 
माजी आ.स्मिताताई वाघ यांची पीडित कुटुंबियांशी भेट, खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी
 
 
पारोळा : अमळनेर मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील महाळपूर गावी एका ११ वर्षीय बालिकेवर बलात्काराची घटना घडल्याने याचा तीव्र शब्दात निषेध करत हा खटला शासनाने जलदगती न्यायालयात चालवून नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मा.आ.स्मिता वाघ यांनी केली आहे.
 

Parola Mahalpur_1 &n 
 
बलात्काराची ही घटना शुक्रवारी ३ जुलै रोजी महाळपूर गावी घडली होती. या घटनेची माहिती मिळताच स्मिता वाघ यांनी तातडीने महाळपूर गाठून त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.हे कुटुंब अतिशय सामान्य व गरीब असल्याने त्यांना धीर देत आरोपीस कोणत्याही परिस्थितीत कठोर शासन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही दिली, यानंतर ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर पारोळा येथे पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरोपीस फाशीचीच शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती पोलिस निरीक्षकांकडे केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष ऍड. अतुल मोरे, सरचिटणीस राकेश पाटील, धीरज महाजन, रविंद्र पाटील, सचिन गुजराथी, राहुल चौधरी आदी उपस्थित होते.
 
 
या घटनेबाबत माहिती देताना माजी आ. स्मिता वाघ यांनी सांगितले की, या नराधमाचे नाव माधु भिला थोरात असे असून त्याचे वय चक्क ६६ वर्ष आहे. आजोबाच्या वयाच्या असलेल्या या निर्लज्य माणसाने आपल्या नातीच्या वयाच्या बलिकेवर कुकर्म करून काळिमाच फासला आहे. या नराधमाच्या कुटुंबातील व्यक्तीने यापूर्वी देखील असेच कृत्य केले असून केवळ दहशतीमुळे ते प्रकरण दाबले जाऊन ते नराधम मोकाट फिरत राहिले, मात्र यावेळी आरोपीने हे कृत्य केल्यानंतर संतप्त गावकर्‍यांनी एकसंघ होत हिंमत दाखऊन पारोळा पोलिसात तक्रार दिल्याने आरोपीस अटक झाली आहे. तो पोलीस कोठडीत आहे.मात्र खान्देशच्या पवित्र भूमीत अतिशय घृणास्पद आणि प्रतिमा मलिन करणारा हा प्रकार असल्याने नराधमास अद्दल घडविण्यासाठी त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि ती फाशी लवकर व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा हीच आमची मागणी आहे. यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांकडे ही मागणी करणार असून यासाठी जळगाव जिल्ह्यात येत असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे संपूर्ण प्रकरण सादर करणार असल्याचे श्रीमती वाघ यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0