कोरोना कहर ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पाच हजारांच्या पार

08 Jul 2020 21:20:42
आज आढळले २०७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
 
corona_1  H x W
 
जळगाव, ८ जुलै :
जिल्ह्यातील कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला असून बुधवारी २०७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. आजच्या आकडेवारीमुळे जिल्ह्याची कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाच हजारांच्यावर गेली आहे. बुधवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अमळनेरात तब्बल ३९ रूग्णांचा समावेश असून जळगाव शहरात २२ नवीन रुग्णांची भर पडली आहे.
 
 
जिल्हा माहिती कार्यालयानुसार, जिल्ह्यात बुधवारी एकूण २०७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यात पारोळा १, पाचोरा १०, चाळीसगाव ३, रावेर ३०, बोदवड ६, जळगाव ग्रामीण ७, चोपडा १८, भुसावळ ८, भडगाव १, धरणगाव २३, यावल ३, एरंडोल १८, जामनेर १, मुक्ताईनगर १९ आणि अन्य जिल्ह्यातील १ रुग्णांचा समावेश आहे.
 
 
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा ५ हजार १० इतका झाला आहे. त्यातील २ हजार ९८३ रूग्ण बरे झाले असून सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार २५० रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा डेडीकेटेड कोविड रूग्णालयात ५१ तर कोविड रूग्णालयात ४२५ रूग्ण उपचार सुरु आहे. तर बुधवारी जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या ८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील २, रावेर, जळगाव, भुसावळ, भडगाव, धरणगाव, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कोरोनाच्या बाधेमुळे मृत झालेल्यांची संख्या आत ३०१ झाली आहे.
 
जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ व अमळनेरात सध्या सक्तीचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यात जळगावमध्ये दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. बुधवारी अमळनेरातही रूग्ण संख्येचा स्फोट होऊन तब्बल ३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अमळनेरमध्ये आधीही मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले होते. पण मध्यंतरी हा तालुका कोरोनामुक्त झाला होता. आता मात्र पुन्हा येथे संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. याचप्रमाणे रावेरातही आता सातत्याने रूग्ण वाढतांना दिसत आहेत. धरणगाव तालुक्यातही संसर्ग वाढीस लागलेला आहे. यातील वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची व्याप्ती वाढल्याचे आजच्या आकडेवारीतून दिसून येते.
Powered By Sangraha 9.0