कोरोना वॉर्डात भरते ‘आरएसएस’ची शाखा; रुग्ण प्रार्थनेत होतात सहभागी

    दिनांक : 31-Jul-2020
Total Views |
 
vsk_1  H x W: 0
 
 
मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे कोविड रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू झाली आहे. या शाखेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकार्‍याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाच्या टीमने त्यांना शेम्फोर्ड स्कूलमध्ये बनवण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी या संघाच्या पदाधिकार्‍याने आयसोलेशन वॉर्डात संघाचा वर्ग घेतला. येथे सध्या आरएसएस पदाधिकारी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना या शाखेच्या माध्यमातून योग, प्राणायाम इत्यादींद्वारे सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करीत आहेत. याबरोबरच येथे संघाची प्रार्थना आणि चर्चा देखील होतात. येथील रुग्ण सकाळी सहा वाजता वॉर्डात ध्वज फडकावून प्रणाम केल्यानंतर शाखेच्या इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. असे केल्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा मानसिक तणावही कमी होतो, आणि योग, प्राणायामामुळे शारीरिक शक्ती देखील वाढते, असा आरएसएसच्या पदाधिकार्‍याचा दावा आहे.
 
 
दररोज भरते शाखा
येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही लोकांना शाखेसाठी तयार केले असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह सोहन श्रीमाली यांनी सांगितले. यानंतर दुसर्‍याच दिवशी पहाटे सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत आयसोलेशन वॉर्डच्या हॉलमध्ये शाखा सुरू केली, या काळात संघाच्या नियमित प्रार्थनाही करण्यात आल्या, असे श्रीमाली म्हणाले. अशा प्रयत्नांमुळे या कोविड सेंटरमधील आयसोलेशन वॉर्डातील सकाळचे वातावरण छान प्रसन्न होऊन जाते. कोणत्याही पेशंटच्या चेहर्‍यावर ताण नसतो आणि चिंताही नसते असेही ते म्हणाले.
 
या सेंटरमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी शाखा घेण्यात येते. कोविड सेंटरमधील आयसोलेशन वॉर्डात कोरोनाचे १६९ रुग्ण आहेत. या शाखेच्या कार्यक्रमात सुमारे ३५ लोक सहभागी होतात. योग आणि प्राणायाम रोग प्रतिकारशक्ती बळकट करतात असे नोडल ऑफिसरचे अतिरिक्त सीएमओ डॉ. अजय कुमार यांनी म्हटले आहे. हे लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित करते. सकाळची शाखा झाल्यावर रुग्णांची दिनचर्या दिवसभर उत्तम राहते.
 
शाखेदरम्यान दररोज गायिले जाणारे गीत आणि प्रार्थना रुग्णांना मानसिक तणावातून मुक्त होण्यास मदत करते.
 
बीएचयू मानसशास्त्रज्ञ प्रो. संजय गुप्ता असेही म्हणतात की, या कृतीमुळे कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मक विचारसरणीचा विकास होईल. मनोबल वाढल्यास ताण सहन करण्याची क्षमता वाढते. तसेच, मानवी संबंध देखील वाढते. परंतु ही सर्व कामे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली तर अधिक योग्य होईल, असेही ते म्हणतात. कोरोना संक्रमणासंदर्भात तयार केलेली मार्गदर्शक सुत्रे देखील येथे पाळली जातात.