निकृष्ट दर्जाच्या आयातीत 371 वस्तू होणार हद्दपार

28 Jul 2020 23:00:05
 
चीनला देणार आणखी एक धक्का
 
नवी दिल्ली : दुय्यम दर्जाच्या गैर-आवश्यक वस्तूंची आयात रोखण्यासाठी भारतीय मानक विभागाने (बीआयएस) कंबर कसली आहे. वाणिज्य मंत्रालयाने ओळख पटवलेल्या 371 वस्तूंच्या दर्जाची मानके कठोर केली जाणार असून, मार्च 2021 पर्यंत हे कार्य पूर्ण केले जाणार आहे. अर्थात्‌ या सर्व आयातीत वस्तूंना देशातून हद्दपार केले जाणार आहे.
 
 

china-india_1  
आयात होणार्‍या या 371 वस्तूंमध्ये पोलाद, रसायने, औषधे, विजेवरील यंत्रणा, खेळणी, घरातील खुर्च्या, मेज व इतर सामानाचा समावेश आहे. चीनसह इतर देशांतून आयात होणार्‍या या 371 वस्तूंची ओळख वाणिज्य मंत्रालयाने पटवली आहे. या वस्तूंच्या दर्जासाठी आम्ही निकष तयार करीत असून, ते अनिवार्य स्वरूपाचे राहतील. याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे बीआयएसचे महासंचालक प्रमोदकुमार तिवारी यांनी आभासी स्वरूपात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
 
 
 
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतील महत्त्वाच्या वस्तूंची ओळख संबंधित मंत्रालयांकडून पटवली जात आहे आणि त्याबाबतचे निकष कठोर करण्यासाठी बीआयएससोबत संपर्क साधला जात आहे, असे त्यांनी सांगितले. यादीतील किती वस्तू निर्धारित मानकांपैकी आहेत, असा प्रश्न विचारला असता, हा एक किचकट मुद्दा आहे. पोलाद, रसायने आणि पेट्रोलियम यासारखी विविध मंत्रालयांना दर्जा निर्धारित करण्यासाठी या वस्तूंची ओळख पटवा, असे सांगण्यात आले, असे ते म्हणाले.
 
 
 
काही वस्तूंची आयात अतिशय कमी प्रमाणात असल्याने त्यांच्या दर्जाचा निकष ठरवला जाणार नाही, तर काही वस्तूंच्या दर्जाचा निकष अगोदरच ठरवण्यात आला, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणावर कॅबिनेट सचिवांची बारीक नजर आहे. काही निश्चित वस्तूंच्या दर्जासाठी निकष तयार करा, असे विविध मंत्रालयांनी सांगितले आहे. काही उत्पादनांसाठी डिसेंबरपर्यंत निकष ठरवले जातील, उर्वरित उत्पादनांचे निकष मार्च 2021 मध्ये ठरवले जातील, असे त्यांनी या 371 वस्तूंच्या दर्जाचे निकष ठरवण्यासाठी अंतिम मुदत काय असेल, या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
Powered By Sangraha 9.0