नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणीची सात लाखाने फसवणूक

24 Jul 2020 21:02:34
गुन्हा दाखल, संशयित तरुणास अटक
 
midc_1  H x W:
 
जळगाव, २४ जुलै
रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगत शहरातील सम्राट कॉलनीतील तरुणीची सात लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आकाश मनोहर पाटील (रा. वडगाव, ता. रावेर) यास अटक केली आहे.
 
 
सम्राट कॉलनीतील योगिता खैरनार यांची मुलगी वर्षा हिने कला शाखेची पदवी पूर्ण केली आहे. ती सुशिक्षित बेरोजगार असल्याने नोकरीच्या शोधात होती. यादरम्यान आकाशने खैरनार कुटुंबियांचा विश्‍वास संपादन केला. तसेच वडील रेल्वेत टी.सी.आहेत असे म्हणून वर्षा खैरनार हिस रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगत आकाशसह त्याचे वडील मनोहर पाटील या दोघांनी २०१८ मध्ये खैरनार कुटुंबियांकडून वेळावेळी पैशांची मागणी करीत सात लाख रुपये उकळले होते. त्यानंतरही मुलीस नोकरी लागली नाही. पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी योगिता खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
 
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासाधिकारी सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, योगेश बारी यांच्यासह कर्मचार्‍यांनी संशयित आकाश पाटील यास शुक्रवारी अटक केली. या गुन्ह्यात संशयित असलेले आकाशचे वडील फरार असून त्यांचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0