धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत १०१८ रुग्ण कोरोनामुक्त

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे : जिल्हाधिकारी संजय यादव
 
 
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ६०.७७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तर मृत्यू दर एप्रिल २०२० मधील २१.४३ टक्क्यांवरून ४.७१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. धुळे जिल्ह्यातील एकूण १६७५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १०१८ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त होवून आपापल्या घरी परतले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
 
 

Corona_Mukt_1   
 
 
जिल्ह्यात १० एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या १६७५ एवढी झाली आहे. त्यापैकी ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६० वर्षांवरील अधिक नागरिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांना कोरोना विषाणूची बाधा होण्यापूर्वी मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे विकार असल्याचे निदर्शनास आले आहे. काही रुग्णांना शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा परिस्थितीत ४५ वर्षांवरील नागरिकांनी मधुमेह, रक्तदाबासारखे विकार असतील, तर काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची प्रारंभिक लक्षणे दिसून येताच, नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात जावून औषधोपचार घेणे आवश्यक आहेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे.
आतापर्यंत धुळे जिल्ह्यातून १०१८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून आपापल्या घरी परतले आहेत. उर्वरित रुग्णांवर डेडिकेटेकड कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर झालेले श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तथा जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, कोविड केअर सेंटर, भाडणे, ता. साक्री, शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक), धुळे, बाफना कोविड केअर सेंटर, धुळे, कोविड केअर सेंटर, शिंगावे, ता. शिरपूर, कोविड केअर सेंटर, शिंदखेडा येथे औषधोपचार सुरू आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६४, जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे येथे ३६, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर येथे ५६, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे ३०, शासकीय तंत्रनिकेतन येथे ८३, कोविड केअर सेंटर, शिंगावे येथे ९५, तर शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये ३० कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत.
 
 
धुळे महानगरपालिका क्षेत्रात १४ जुलैअखेर ८३२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५५० रुग्णांना औषधोपचारांती घरी सोडण्यात आले आहे. सध्या २४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धुळे जिल्हा ग्रामीण भागात ८४३ रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी ४६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
 
कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ५५ बेडचा अद्ययावत आयसीयू कक्ष उभारण्यात येत आहे. या कक्षाचे काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे. याशिवाय चारशेपेक्षा अधिक बेडपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह शिरपूर व दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णालयांमध्ये होणारी काळजीपूर्वक देखभाल, वेळोवेळी होणारे औषधोपचार यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.७७ टक्क्यांहून अधिक आहे. बरे होणार्‍या रुग्णांमध्ये ६ महिन्यांच्या बाळापासून ते ९४ वर्षाच्या व्यक्तीचा समावेश आहे.
 
 
या रुग्णांवर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी संजय यादव, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., मनपाचे आयुक्त अजिज शेख, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू आहेत.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तपासण्यांचे प्रमाण वाढविल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, जिल्हा प्रशासन अतिशय संयमाने परिस्थिती हाताळत आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोना विषाणूला आपल्या धुळे जिल्ह्यात निश्चितच अटकाव करता येईल, असा मला विश्वास आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
- मा. अब्दुल सत्तार, पालकमंत्री, धुळे जिल्हा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत १०१८ रुग्ण बरे होवून आपापल्या घरी परतले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारांसाठी आता खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. नागरिकांनी घरीच राहून सुरक्षित राहावे. अत्यावश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे. सुरक्षित अंतर ठेवत मास्कचा वापर करावा. हात वेळोवेळी सॅनेटायझर करावेत अथवा साबणाने धुवावेत. नागरिकांनी आवश्यक सहकार्य केले नाही, तर नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल.
- संजय यादव, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, धुळे