हवेत फायरिंग करणार्‍या चौघांना अटक

10 Jul 2020 19:45:16
माजी महापौरांच्या मुलाचाही सहभाग; शहर पोलिसांची कारवाई
crime_1  H x W: 
जळगाव, १० जुलै
शहरात शिवाजीनगरातील उस्मानिया पार्क परिसरात गुरूवारी सायंकाळी दोन जणांच्या वादातून हवेत फायरिंग झाली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासात मद्यपी चौघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे हस्तगत केले. अटक केलेल्या तरुणांमध्ये माजी महापौरांच्या मुलाचाही सहभाग असून चौघांनावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 
शहरातील खिश्तीया (उस्मानिया) पार्क परिसरात एका विहिरीजवळ संशयित राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (३०, रा. क्रांती चौक, शिवाजी नगर), मिलिंद शरद सकट (२७, रा. गेंदालाल मिल), मयुर उर्फ विकी दिपक अलोणे (२६, रा. आर.वाय.पार्क) आणि इम्रान उर्फ इमु शहा रशिद शहा (२८, रा. गेंदालाल मिल) हे चौघे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बियर पीत बसले होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या समोरून जात असतांना यातील मयूरने कोठे जात आहात? असे विचारल्याने दोघात वाद झाला. वादाचे थोड्यावेळात हाणामारीत झाले. तर मयूरने बियरची बाटली फेकून मारली असता यात भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सुफियान शकिल बेग मिझा (२२,रा. शिवाजीनगर हुडको) यांच्या उजव्या डोक्याला जखमी झाली. त्याचवेळी मयूर अलोणेने त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून हवेत दोन फायरिंग केले व तेथून चौघेजण पळाले.
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हाणामारी करणारे तरुण पोलिसांच्या हाती लागले नाहीत. हाणामारीच्या घटनेत फायरिंग झाल्याची चर्चा असल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन हे निरीक्षकांसह घटनास्थळी तसेच उस्मानिया पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत शहर पोलिसांची कारवाई करीत होते. या घटनेतील संशयित राजू सपकाळे हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा आहे. राजू सपकाळे आणि मिलींद सकट यांना घटनास्थळाहून ९ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असताना इम्रान आणि मयूर हे शिरसोली येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी पथक तयार करून शिरसोली येथे रवाना केले. १० रोजी रात्री २ वाजता शिरसोलीतून संशयित आरोपी मयुर अलोणे आणि इम्रान शहा यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील दोन गावठी बनावटीचे कट्टे हस्तगत केले.
 
याप्रकरणी पोना अक्रम शेख यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दीपक बिरारी करत आहे.
 
यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन आणि पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ वासुदेव सोनवणे, गणेश शिरसाळे, अक्रम शेख, प्रमेश ठाकूर, सुधीर सावळे, सचिन वाघ, रतन गिते, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, गणेश पाटील, महेंद्र पाटील, निलेश पाटील, सुनिल वाणी, योगेश इंधाटे, तेजस मराठे यांनी कारवाई केली.
Powered By Sangraha 9.0