फुले मार्केटमध्ये ‘नो एन्ट्री’

    दिनांक : 01-Jul-2020
Total Views |
मनपा प्रशासनाची कारवाई, ११ दुकाने सील
 
 
 
fule market_1  
जळगाव, १ जुलै
मनपा प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही विक्रेते आपली दुकाने थाटत असल्याचे निदर्शनास आल्याने बुधवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी फुले मार्केट सील केले आहे. तसेच शहरातील नियमांचे उल्लंघन करणारी ११ दुकानेसुद्धा सील करण्यात आली आहेत.
 
 
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फुले मार्केटमध्ये व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी ही कारवाई केली. त्यामुळे आता फुले मार्केटमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी फक्त हातगाडीलाच गुप्ता नमकीन कडील लहान गेटमधून प्रवेश मिळणार आहे. तसेच येथे पोलिसांचे सहकार्य मिळावे, यासाठी शहर पोलीस स्टेशनची मदत घेतली जाणार आहे.
 
 
यावेळी सुमारे ४० हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्सिंग पालन न करणे, तोंडाला मास्क न वापरणे तसेच सम-विषम नियमांचे उल्लंघन करणार्‍या सराफ गल्लीतील ३, फुले मार्केटमधील २, नटवर मॉलमधील १, गणेश कॉलनीतील १ तर इतर ४ अशी एकूण ११ दुकाने मनपा प्रशासनाकडून सील करण्यात आली.
 
दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रणासाठी शासनाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु, बर्‍याच मार्केटमध्ये असे आढळून येत नाही. त्यामुळे फुले मार्केट सीलची कारवाई झाली. यावरही दुकानदार ऐकत नसतील तर प्रशासनाकडून कारवाईचे स्वरुप अधिक कडक करण्यात येईल.
- संतोष वाहुळे, उपायुक्त, मनपा