शिरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातून दहा जणांची कोरोना विषाणूवर मात

08 Jun 2020 22:09:10
 
 
जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज
 
 
Shirpur Corona Discharge_
धुळे : शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल दहा रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली. त्यांना आज जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. शिरपूर उपजिल्हा रुग्णालय डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तेथे सध्या २४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दहा रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
 
यावेळी जिल्हाधिकारी यादव यांच्यासह अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, तहसीलदार आबा महाजन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुवराज वाघ, डॉ. अभय शिनकर, डॉ. अमोल जैन, डॉ. महेंद्र साळुंखे, डॉ. कपिल पाटील, डॉ. योगेश अहिरे आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणूमुक्त रुग्णांना पुष्पवृष्टी करीत निरोप देण्यात आला. तसेच भेट म्हणून फळांची परडी देण्यात आली. जिल्हाधिकारी यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. नेहमी मास्कचा वापर करावा. तसेच सुरक्षित अंतर ठेवावे, असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0