‘फेअर’चे ‘अफेअर!’

    दिनांक : 29-Jun-2020
Total Views |
 
कधी माणसांना आवश्यक... अत्यावश्यकच वस्तूंची निर्मिती हव्या त्या प्रमाणात केली जात असे. म्हणजे वस्तूंमध्ये काही स्पर्धा नव्हती. त्यामुळे जाहिरातही नव्हती. माणसाचे जग विस्तारत गेले म्हणजे त्याच्या गरजांचाही विस्तार झाला. गरजा भागविण्यासाठी मग तो गावाबाहेर पडला. कारण, गाव त्याच्या गरजा भागविण्यास अपुरे पडू लागले. उद्योग सुरू झाले आणि मग त्यात माणसाला नको असलेल्या वस्तू भरमसाट प्रमाणात निर्माण केल्या जाऊ लागल्या. वस्तूंमध्येच स्पर्धा लागली. त्यातून मग जाहिराती निर्माण झाल्या. गरजांना वस्तू ते वस्तूंसाठी गरजा, असा प्रवास पूर्ण झाला होता. बाजार ही संकल्पना व्यापक होत गेली आणि मग बाजाराने गरजांसकट माणसांचे सारे जगच गिळंकृत केले. नसलेल्या गरजा निर्माण केल्या गेल्या... ‘फेअर अॅण्ड लव्हली’ या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या गोरेपणाच्या मलमाचे नाव आता बदलण्यात आले आहे. त्यातला ‘फेअर’ हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. संकल्पनांसाठी नेमके शब्द वापरले जातात. ते आवश्यकच असते. आता ‘फेअर’ या शब्दाचा अर्थ चांगला, सच्छील, नीतिवान असा काहीसा होतो. मात्र, हा मलम गोरेपणा देणारा असल्याचा दावा त्या मलमाच्या जाहिरातीतच केला जात असल्याने, फेअरचा अर्थ गोरेपणा असाच होत होता. आताच नेमके या कंपनीने आपल्या या उत्पादनाचे नाव का बदलले असावे?
 
 

fain_1  H x W:  
त्याचा थेट संबंध अमेरिकेत सुरू असलेल्या वर्णद्वेषविरोधी आंदोलनाशी जोडला जाणेही अगदीच स्वाभाविक आहे. तसा तो जोडलाही गेला. अगदी प्रथमदर्शनी प्रतिक्रिया तीच उमटली. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड नामक कृष्णवर्णीय इसमाला तिथल्या श्वेतवर्णीय पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे ठार मारले. त्यानंतर तिथे हे आंदोलन सुरू झालेले आहे. त्यानंतर आता या क्रीमचे नाव बदलण्यात आले. फेअर म्हणजे गोरे नव्हे, लव्हलीच असायला हवे, असे कंपनीला अधोरेखित करायचे आहे. असा नामबदल करणे ही ‘स्मार्ट मूव्ह’ आहे. त्यातून अमेरिकेत गोर्‍या शिपायांच्या अनफेअर वर्तनावर सूचक असे भाष्य करतानाच व्यवसायवृद्धी साधून घेणे, व्यापारासाठी त्या वर्णद्वेषी चळवळीचा नीट वापर करून घेण्याचे चातुर्य साधण्यात आले आहे. जाहिरात या पासष्टाव्या कलेचा हा उत्तम नमुना आहे. सारख्याच प्रकारची उत्पादने निर्माण करणार्‍या कंपन्या जाहिरातीत असले शब्दांचे खेळ करत असतात. मागे, प्रुडेन्शियल क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी दोन शीतपेेय कंपन्यांतील शीतयुद्ध असेच रंगले होते. पैकी एका कंपनीने विश्वचषक प्रायोजित केला असल्याने ‘ऑफिशियल िंड्रक ऑफ वर्ल्ड कप,’ अशी ते जाहिरात करीत होते. दुसर्‍या कंपनीने लगेच ‘निंथग ऑफिशियल अबाऊट इट,’ अशी जाहिरात सुरू केली... अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
 
 
त्या उत्पादनाचे नाव बदलण्यामागे आमचा तसला काहीही उद्देश नाही, असे कंपनीने म्हटले असले, तरीही नेमक्या याच वेळी नामबदल करणे म्हणजे पुरेसे बोलके आहे. एकतर ते उत्पादन काही गोर्‍यांच्या देशांत विकले जाणारे नाही. त्वचेला गोरेपणा देणारी जितकी काही उत्पादने आहेत त्यात थेट गोरेपणा असा शब्द या आधीही वापरला जात नव्हता. आमचे क्रीम वापरले की इतके दिवसांत त्वचा गोरी होते, हे अगदी सुरुवातीला सांगितले जायचे. त्यातून मग वर्णभेद अधोरेखित होतो म्हणून मग त्वचा नितळ होते, ग्लो येतो... असे काही सांगण्यात येऊ लागले. त्या सार्‍याच उत्पादनांना ‘फेअरनेस क्रीम’ असेच म्हटले जाऊ लागले. जगात हा वर्णभेद आहेच. त्यात गौरवर्णाचे सार्‍यांनाच अप्रूप आहे. वर्ण आणि वंशश्रेष्ठत्वाची भावना अनादी आहे. ती अनंतही आहे, असे नाईलाजाने म्हणावे लागेल. कारण, ‘जात नाही जात,’ हे आपण प्रबोधनाच्या अखंड चळवळीनंतर निरुपायाने मान्य करून टाकले आहे. तसेच हेही आहे. वर्णश्रेष्ठत्व विविध रूपांनी कायम ठसविले गेले आहे. गोर्‍यांनी अर्ध्या पृथ्वीवर राज्य केले. त्यांच्या सत्तेचा सूर्य मावळतच नव्हता, असे म्हणतात. त्यात त्यांची भाषा आणि हे वर्णश्रेष्ठत्व नकळत भारतीय जनमानसाच्या मानसिकतेत घट्‌ट जाऊन बसले आहे. त्या आधी ते इतक्या प्रमाणात असल्याचे फारसे पुरावे नाहीत. सौंदर्यप्रसाधने होती, मात्र, गोरेपणाच्या नावाखाली ‘फेअरनेस क्रीम’ नव्हते. साहेब गेले, पण साहेबीपणाचे हे गारूड मात्र काही गेल्या गेले नाही. आम्ही भाषा, वेश, पेहराव, लकबींपासून बर्‍याच गोष्टींची गुलामी मात्र टाकू शकलो नाही. भारत हा काळ्यांचाच देश आहे आणि म्हणून तो गुलामांचा देश आहे, अशी त्यांची कायम भावना राहिली आहे. मोहनदास करमचंद गांधी नामक तरुण बॅरिस्टरला दक्षिण आफ्रिकेत गोर्‍यांच्या डब्यातून धक्के मारून घालवून देण्यात आले, त्यानंतर त्यांनी या वर्णभेदाच्या विरोधात चळवळ उभी केली. त्याच महात्मा गांधींच्या देशात गोरेपणा म्हणजे ‘फेअर’ हे रूढ झालेले आहे. कृष्णवर्णीयांनाच आपले हे उत्पादन विकायचे आणि त्यातही त्यांना काळेपणा म्हणजे ‘अनफेअर’ हे सांगून विकायचे, ही चलाखी आतावर सुरू होती. आमच्या मनांवर त्याचे परिणाम घट्‌ट आहेत. अगदी आमचे क्रिकेटपटू वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूला ‘कालू’ म्हणून हाक मारतात. गोर्‍यांच्या स्पर्शाआधी, आमचे देव श्यामवर्णीय आहेत, याचा आम्हाला अभिमान होता. आता तोही उल्लेख टाळला जातो... आता वधू-वरांच्या जाहिरातीतही ‘मुलगी गौरवर्णीय हवी,’ अशी थेट अटच असते. मुलगा कुट्‌ट काळा असला, तरीही त्याला बायको गोरीच हवी असते. संतती गोरी निपजावी यासाठी ही मागणी. त्वचेच्या रंगावरून कर्तृत्व ठरत नाही, हे माहिती असूनही दिसण्यावरच भाळण्याची तीच तीच चूक आपण कायम करीत आलेलो आहोत.
‘गोरी गोरी पान, फुलांसारखी छान; दादा मला एक वहिनी आण...’ असे एक बालगीत आहे. गदिमांनीच लिहिले आहे. त्यांनीच, ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख...’ हेही गीत लिहिले. ‘गोरी गोरी पान’ ही कविता शालेय अभ्यासक्रमातही होती. बालसुलभ भावना असली, तरीही गोरी म्हणजेच छान, हे नकळत मुलांच्या मनावर ठसविले जाते, हे कुणाच्या लक्षातही आले नाही. कुणी त्यावर विचारही केला नाही. कारण, छान म्हणजे गोरेच, हे आम्ही मान्यच केले आहे. शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांनी मात्र 30 वर्षांपूर्वी, या कवितेतून होणारी विसंगती हेरली आणि ही कविता शिकविण्यास नकार दिला. त्या कवितेत त्यांनी ‘हासरी-लाजरी खेळकर छान, दादा मला एक वहिनी आण...’ असा बदल केला आणि ती कविता शिकविली. मात्र, त्याआधी किमान दोन पिढ्यांवर अगदी बालवयातच नकळत ‘गोरी गोरी पान म्हणजेच छान,’ हे संस्कार झालेलेच होते. आताही गोरेपणाला विविध क्षेत्रात भाव आहे. चित्रपट, नाटक यात मेकअप म्हणजे त्वचा तात्पुरती गोरी करणे, असाच समज आहे. अगदी स्वागतिकादेखील गोरीच हवी असते. या गोरेपणातून पुरुषांना काही प्रमाणात सूट मिळाली असली, तरीही सुंदर पुरुषांचे वर्णनही ‘तरणाबांड, गोरापान’ असेच केले जाते. सौंदर्याचे निकष त्या त्या देशाच्या, प्रदेशाच्या नैसर्गिक ठेवणीनुसार ठरत असतात. आफ्रिकन देशांत जाडजूड ओठ असणे हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते. त्यासाठी मग प्रयत्न केले जातात. आपल्याही देवी-देवतांच्या सौंदर्याचे वर्णन करताना गौरवर्ण हा सौंदर्याचा निकष मानला गेलेला नाही. त्यामुळे गोरेपणा ही आमची गरज कधीच नव्हती आणि नाहीदेखील; पण आधीच सांगितल्यानुसार ‘गरजेला वस्तू’, प्रमेयापेक्षा ‘वस्तूसाठी’ गरज निर्माण करण्याचे बाजारतंत्र हावी झालेले आहे. गोरेपणा म्हणजे ‘फेअर’ हे आधी िंबबविले गेले आणि नंतर खरबो रुपयांची उलाढाल असलेल्या सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ निर्माण करण्यात आली. आजवर या क्रीम्सने कुणी गोरे झाल्याचे ऐकिवात नाही, तरीही शंभर-दीडशे रुपये रोजाने कापूस िंनदायला जाणारी आमची सावळी शेवंता, साडेतीन ते चार हजार रुपये किलोचे हे फेअरनेस क्रीम वापरू लागली आहे! 400 रुपये किलोचे तूप ती खात नाही. तिच्या मनावर हे िंबबविण्यासाठी भारतीय तरुणींना जागतिक सौंदर्यवती ठरविण्यात आले. फेअरनेसच्या नावाखाली असले अनफेअर उद्योग कायम सुरू आहेत...!
https://www.tarunbharat.net//Encyc/2020/6/29/Fair-s-Affair-.html