देशात कोरोनाचा हाहाकार; २४ तासात ४१० रुग्णांचा बळी

    दिनांक : 28-Jun-2020
Total Views |


रुग्णवाढीने पुन्हा गाठला उच्चांक; 24 तासात 19 हजार 906 नवे रुग्ण

 

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असून आकडेवारी नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाच्या तब्बल 19 हजार 906 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासात 410 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे.

 
 
Corona_Death_1  
 

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 19 हजार 906 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 28 हजार 859 वर पोहोचली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे 16 हजार 095 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 
 

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी सध्या 2 लाख 03 हजार 051 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3 लाख 09 हजार 713 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 58 टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे.