'या' राज्याने वाढवले ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


 

रांची : झारखंड सरकारने राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेता लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारने शुक्रवारी एक आदेश जारी केला असून राज्यातील लॉकडाऊन ३१ जुलै २०२० पर्यंत वाढवला आहे. यापूर्वीच्या अटी शर्ती या लॉकडाऊनमध्ये कायम राहणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

 

Jharkhand_1  H  

 

 
देशातील अनेक राज्यांनी ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची घोषणा केली आहे. झारखंडमध्ये यापूर्वी २५ जूनपासून कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी सूट देण्यात आली आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये बससेवा, सलून आणि सार्वजिनिक सोहळ्यांना बंदी कायम ठेवण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्य सचिव सुखदेवसिंह यांच्या सहीने हा लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात - कॉमर्सवरील बंदी उठविण्यात आली आहे.

 

 
सरकारने यापूर्वी बंदी घातलेल्या आस्थापनांवर यापुढेही बंदी कायम राहणार आहे. त्यामुळे, धार्मिक ठिकाणी सर्वसामान्य लोक नेहमीप्रमाणे एकत्र येऊ शकणार नाहीत. नेहमीप्रमाणे पूजा होणार नाही. सामाजिक उपक्रम, राजकीय, खेळ, मनोरंजन, ॲकेडमिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसह यात्रांनाही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था, कोचिंग क्लासेस, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल हे सर्वकाही बंदच राहणार आहे.