वेळेआधीच मान्सूनने व्यापला संपूर्ण देश

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


 
 १२ दिवस आधीच झाले आगमन

 

 
नवी दिल्ली : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) काल गुरूवारी संपूर्ण देश व्यापला. महत्वाचे म्हणजे १२ दिवस आधीच मान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. सर्वसाधरणपणे देशातील मान्सूनची अंदाजित वेळ जुलै होती. पण यंदा १२ दिवस आधीच म्हणजेच २६ जून रोजी मान्सूनने देश व्यापला. यंदाच्या हंगामात १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
 
 

Monsoon_1  H x  
 

बंगालच्या उपसागरात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे यंदा वेळेआधीच १७ मे रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर अरबी सुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर नियोजित वेळेत एक जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान, शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. सोलापुरातील माळशिरसमध्ये १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

 

 
निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूची वाटचाल मंदावली होती. मात्र, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वेळेआधीच मान्सूनने देश व्यापला. महाराष्ट्रात ११ जून रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मान्सून दाखल झाला. याचवेळी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चाल मिळाल्याने मान्सूनने एक दिवस आधीच (१४ जून) महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर पुन्हा गुजरात, मध्य प्रदेशसह पूर्व भारतात प्रगती केल्यानंतर प्रवाह कमजोर झाल्याने आठवडाभर मान्सूनने कोणतीही प्रगती केली नव्हती. मान्सूनची तिसऱ्यांदा रेंगाळलेली वाटचाल २३ जून रोजी पुन्हा सुरू झाल्यानंतर चार दिवसांतच (ता.२६ जून) त्याने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.