लडाखमध्ये चिनी सैनिकांच्या हालचाली वाढल्या

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


 सॅटेलाईट इमेजने समोर आणली धक्कादायक बाब

  

नवी दिल्ली : गलवान खोर्यातून अंशत: माघार घेणार्या चीनने लडाखच्या सीमेवरील फिंगर-4 आणि फिंगर-5 या भागात आपल्या हालचाली वाढविल्या असून, तिथे सैनिकांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब सॅटेलाईट इमेजमधून समोर आली आहे.
 
 
 

Movement_Chinese_1 & 
 

पेंगॉंग सरोवराच्या भागात या हालचाली जास्त वेगाने सुरू आहेत. एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त आज प्रकाशित केले आहे. या दैनिकाकडे सॅटेलाईट इमेजही उपलब्ध असून, त्यात चिनी सैनिकांच्या वाढत्या हालचाली स्पष्टपणे दिसत आहेत.

 
 

फिंगर-4 आणि फिंगर-8 हा परिसर चीनच्या सैनिकांनी रिकामा करावा, अशा सूचना भारताकडून वारंवार केल्या जात आहेत. मात्र, चीन त्याच भागात आपल्या सैनिकांची संख्या वाढवत आहे. या दोन्ही तळांना जोडणारा रस्ता चीनने तयार केला असून, याच मार्गाने सध्या चिनी सैनिकांची वाहतूक सुरू आहे. एकीकडे सैनिकांची संख्या वाढवितानाच, त्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी दुसरी तुकडी काही अंतरावरच तैनात करण्याच्या दिशेने हालचाली करीत आहे.

 
 

भारताकडून जवानांची जमवाजमव

चीनच्या या घातक हालचाली लक्षात घेऊन, भारतानेही या भागात आपल्या जवानांना तैनात करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या हालचाली टिपण्यासाठी मोठमोठे आरसेही लावले जात आहेत. शिवाय, भारतीय छावण्यांची संख्याही वाढली असल्याचे या इमेजमध्ये दिसत आहे.

 
 

भारतीय सशस्त्र दलांचा युद्धाभ्यास

दरम्यान, लडाखच्या लेह येथे भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे जवान अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून युद्धाभ्यास करीत आहेत. चिनुक आणि सुखोई यासारख्या लढाऊ आणि वाहतूक विमानांचा यात वापर करण्यात आला. दोन्ही सशस्त्र दलांमध्ये योग्य समन्वय प्रस्थापित करणे, हा यामागील उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.