टेनिसपटू ग्रिगोर दिमित्रोव, बोर्ना कोरीक कोरोनाबाधित

23 Jun 2020 14:46:55
 

Tennis Corona_1 &nbs 
 
नवी दिल्ली :  क्रिकेट विश्वातही कोरोनाचा शिरकाव झाला असून यानंतर आता दोन टेनिसपटूही कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. बल्गेरियन टेनिस स्टार ग्रिगोर दिमित्रोव आणि क्रोएशियाचा बोर्ना कोरीक यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली आहे. अधिकृत ट्विटर हँडलवर कोरीकने याची पुष्टी केली. जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर आणि तीन वेळा ग्रँड स्लॅम सेमीफायनलिस्ट दिमित्रोवने त्याची कोरोना चाचणी सकारात्मक असल्याचे घोषित केले होते. दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यावर क्रोएशियामध्ये सुरू असलेली प्रदर्शन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू नोवाक जोकोविच सुद्धा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार होता.
 
 
दुसरीकडे, कोरीक म्हणाला, माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करवून घ्यावी. यापूर्वी दिमित्रोवने इंस्टाग्रामवर कोविड-१९ संक्रमित असल्याचे जाहीर केले होते. यानंतर कोरीकसह सुमारे १००० लोकांची चाचणी घेण्यात आली.
 
 
 
प्रदर्शन स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्यात कोरीक जादरमध्ये दिमित्रोवविरुद्ध खेळला. या सामन्यानंतर दिमित्रोव्हने थकवा असल्याची तक्रार केली. बल्गेरियन खेळाडूने सांगितले की त्याला मोनाको येथे घेण्यात आलेल्या चाचणीत संसर्ग झाल्याचे आढळले. दरम्यान, माजी टेनिसपटू आणि जोकोविचचे प्रशिक्षक गोरान इव्हानिसेविच म्हणाले की दिमित्रोवची बातमी धक्कादायक होती आणि आता सर्वांनाच टेस्ट करून घ्याव्या लागतील.
Powered By Sangraha 9.0